भारताची बदनामी करण्याचे आंतरराष्ट्रीय षडयंत्र

विजयाताई रहाटकर यांचा आरोप; महिला अत्याचाराचा अहवाल चुकीचा

नगर –ब्रिटनमधील थॉमसन रॉयटर फौंडेशन या संस्थेचा अहवालच चुकीच्या गृहितकांवर आधारित आहे. त्यातून भारताची बदनामी करण्याचे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे, असा आरोप राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजयाताई रहाटकर यांनी केला. असे असले, तरी सारे काही आलबेल नाही, महिला अत्याचाराचे आपण समर्थन करीत नाही, असे त्यांनी सांगितले.
राज्य महिला आयोगाच्या वतीने “महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी थॉमसन रॉयटर संस्थेचा अहवाल टाकाऊ आहे, तो अजिबात स्वीकारण्यासारखा नाही, असे स्पष्ट केले. जगात कुणीही उठतो, तज्ज्ञ म्हणवितो आणि अहवाल देतो, ते स्वीकारता येणार नाही, असे सांगून त्या म्हणाल्या, “”जगातील 517 लोक अहवाल देतात. त्यांची गृहितके कोणती हे माहीत नाही. चुकीच्या अनुमानावर आधारित गृहितके ते मांडतात. देशातील सव्वाशे कोटी लोकसंख्येला समजावून न घेता भारत महिला अत्याचारांच्या बाबतीत जगात आघाडीवर आहे, असे सांगतात. ते कुणाला भेटले, कधी भेटले, याची माहिती उपलब्ध नाही. भारताला पाकिस्तान, सीरिया, अफगाणिस्तानपेक्षाही खाली ढकलतात, हे कसे मान्य करायचे? भारताची संस्कृती वेगळी आहे. इथे महिलांचा सन्मान केला जातो. काही चुकीचे घडत असेल, तरी त्याबाबत कायदे आहेत. बालविवाह, सतीच्या प्रथा याच देशात रद्द झाल्या. अजूनही काही चुकीचे घडत असेल, तर ते दुरुस्त करण्याची तयारी आहे; परंतु भारताला बदनाम करण्याचा प्रकार सहन करणार नाही.”
जगभरातील नामांकित स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, समाजविज्ञान शाखांचे ज्येष्ठ अभ्यासक इत्यादींकडून विविध निकषांद्वारे वतीने जगभरातील महिलांच्या स्थितीविषयी सर्वेक्षण केले जाते. 2011 च्या सर्वेक्षणात महिलांच्या धोकादायक स्थितीबाबत भारत जगात चौथ्या नंबरवर होता; पण आता 2018 च्या पाहणीत भारताचा नंबर सगळ्यात वरचा लागला आहे. ब्रिटनमधील थॉमसन रॉयटर फौंडेशन या संस्थेच्या अहवालाला शून्य महत्त्व आहे, अशी संभावना त्यांनी केली. महिलांच्या छळाचे प्रमाण कमी होण्यासाठी आता मानसिक बदल करण्यावर भर देऊन श्रीमती रहाटकर म्हणाल्या, की कुटुंबात लहानपणापासून मुला-मुलींवर समानतेचे आणि प्रतिष्ठा देण्याचे संस्कार झाले पाहिजेत. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जे कायदे केले आहेत, त्या कायद्यातील तरतुदी सौम्य करणे योग्य नाही. महिलांच्या शारीरिक व मानसिक छळाच्या कायद्याचा दुरुपयोग करण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी झाले आहे. आता या गुन्ह्याबाबत पूर्वीसारखे होत नाही. पोलीस अधिकारी पत्नी, पत्नींना एकत्र बसवून समुपदेशन करतात. त्यानंतरही फिर्याद दाखल झाली, तर पोलीस त्याची शहानिशा करतात.
महिला सुरक्षित करण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न व्हायला हवेत.
गेल्या वर्षभरात महिला आयोगाकडे पावणेचार हजार अर्ज आले होते. त्यापैकी दीड हजार अर्ज समुपदेशन करून निकाली काढण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. महिलांच्या येणाऱ्या तक्रारीत सर्वांधिक वाटा वैवाहिक समस्यांच्या तक्रारींचा असतो. राज्य महिला आयोगाने आता ज्या पती-पत्नींत वाद होऊन जिथे संसार मोडकळीस आले, त्या कुटुंबातील महिलांच्या पुनर्वसनावर भर दिला आहे. मुलांचे ही पुनर्वसन करण्यात येत आहे. त्यासाठी दोनशे स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जात आहे, अशी माहिती श्रीमती रहाटकर यांनी दिली. तत्पूर्वी “महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाचे उद्‌घाटन करताना हा उपक्रम का सुरू केला, याची माहिती त्यांनी दिली. सरकार महिलांबाबत सवेदनशील आहे. सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. राज्य महिला आयोगाकडे पुरुषांच्या तक्रारीही येत असतात, असे त्यांनी सांगितले.

पैसे घेतल्याच्या तक्रारींची चौकशी

महिलांच्या समुपदेशनासाठी नेमलेल्या स्वयंसेवी संस्था पैसे घेत असल्याच्या तक्रारी आहेत. या मुद्याकडे श्रीमती रहाटकर यांचे लक्ष वेधले असता, आमच्यापर्यंत अशा तक्रारी आल्या नाहीत; परंतु याबाबत चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)