हॉकी वर्ल्ड लीग: भारताची घोडदौड हॉलंडने रोखली

लंडन, दि. 20 – हॉकी वर्ल्ड लीग स्पर्धेच्या उपान्त्य फेरीतील भारतीय पुरुष संघाची घोडदौड अखेर माजी जगज्जेत्या हॉलंडने रोखली. पहिल्या मिनिटापासून सामन्यावर वर्चस्व गाजविणाऱ्या हॉलंडने हा सामना 3-1 असा िंजंकून ब गटात अग्रस्थानासह उपान्त्यपूर्व फेरी गाठली. भारताने ब गटातून दुसऱ्या क्रमांकासह उपान्त्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.

त्याआधी सामन्यातील दुसऱ्याच मिनिटाला गोल करीत हॉलंडने भारतावर दडपण निर्माण केले. यातून बाहेर पडणे भारतीय संघाला जमलेच नाही. ब्रिंकमनने हा गोल करीत हॉलंडला 1-0 आघाडीवर नेले. त्यानंतर 13व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर बार्टने हॉलंडचा दुसरा गोल केला.

पहिल्या सत्रानंतर 2-0 अशी आघाडी मिळविणाऱ्या हॉलंडने दुसऱ्या सत्रातील आठव्या मिनिटाला गोल करीत ही आघाडी 3-0 अशी वाढविली. प्रुईसरने हा गोल केला. मात्र त्यानंतर पाचच मिनिटांनी आकाशदीप सिंगने भारताचा पहिला गोल करीत पिछाडी 1-3 अशी कमी केली. तिसऱ्या सत्रात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. मात्र सरदार सिंगला पंचांनी पिवळे कार्ड दाखविले.

चौथ्या सत्राच्या प्रारंभीच धसमुसळा खेळ केल्याने पंचांनी हॉलंडच्या क्रूनला पिवळे कार्ड दाखविले. परंतु त्यामुळे सामन्याच्या निकालात फरक पडला नाही. भारतीय आक्रमणफळीने आटोकाट प्रयत्न करूनही त्यांना चौथ्या सत्रात हॉलंडचा बचाव भेदता आला नाही व अखेर भारताला 1-3 असा पराभव पत्करावा लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)