भारताचा दणदणीत विजय ! न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव

पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव

नेपिअर: चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचे चार बळी, मोहम्मद शमीचा भेदक मारा आणि शिखर धवनच्या नाबाद 75 धावांची संयमी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 8 गडी आणि 85 चेंडू राखून पराभव केला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर केवळ 158 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु, प्रखर सूर्यप्रकाशामुळे 30 मिनिटे खेळ थांबवण्यात आल्यावर भारताला 49 षटकात 156 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या मोहम्मद शमीला सामनावीरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्याने 6 षटकांत 19 धावा देत 3 बळी घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी सर्वबाद 157 धावा केल्या. न्यूझीलंडचा डाव स्वस्तात आटोपल्यामुळे भारतीय संघाला लवकर फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. प्रत्युत्तरात फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाने सावध सुरुवात केली. रोहित शर्मा संथ खेळत असताना मात्र शिखर धवन न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत होता. त्यानंतर लंच ब्रेक झाला. ब्रेकनंतर रोहित शर्मा 11 धावावर बाद झाल्यावर शिखर धवन आणि विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. दरम्यान, शिखर धवनने अर्धशतक पूर्ण केले. हे दोघेच भारताला विजय मिळवून देणार असे वाटत असताना विराट 45 धावांवर बाद झाला. विराट – शिखर धवन यांनी 89 धावांची भागीदारी केली. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या अंबाती रायुडूला साथीत घेत धवनने भारताला विजय मिळवून दिला. धवन 75 धावांवर तर रायुडूने 13 धावावर नाबाद राहिले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाची सुरुवात खराब झाली. मोहम्मद शमीने सलामीवीर मार्टिन गुप्टिलचा 5 धावावर त्रिफळा उडवीत न्यूझीलंडला पहिला झटका दिला. कोलिन मुन्‍रोला बाद करत शमीने न्यूझीलंडची अवस्था 2 बाद 18 अशी केली. त्यानंतर कर्णधार केन विलियम्सन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी संघाचा डाव सावरला. परंतु, सावध फलंदाजी केल्याने न्यूझीलंडच्या धावसंख्येला खीळ बसली. खेळपट्टीवर स्थिरावल्यावर त्यांनी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु, अनुभवी रॉस टेलरला 24 धावावर बाद करत चहलने त्यांची भागीदारी संपुष्टात आणली. यष्टीरक्षक फलंदाज टॉम लॅथमलाही चहलने बाद केले तेव्हा त्यांची अवस्था 4 बाद 76 अशी झाली. त्यानंतर हेन्‍री निकोल्सही लवकर बाद झाल्यावर कर्णधार केन विलियम्सनने एकाकी झुंज देताना न्यूझीलंडला दीडशे धावा उभारून दिल्या. तो 81 चेंडूत 64 धावा करून बाद झाला. कुलदीप यादवने न्यूझीलंडचे शेपूट गुंडाळले. न्यूझीलंडला सर्वबाद 157 धावांपर्यंत मजल मारता आली. भारतासाठी कुलदीप यादवने 4, शमीने 3, चहलने 2 तर केदार जाधवने एक बळी मिळवला.

संक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड : सर्वबाद 157 – मार्टिन गुप्टिल 5 (त्रि. गो. शमी), कॉलिन मुन्‍रो 8 (त्रिफळा गो. शमी), केन विल्यमसन 64 ( गो, कुलदीप, झे. शंकर), रॉस टेलर 24 ( झे. व गो. चहल ), टॉम लॅथम 11 ( झे. व गो. चहल ), हेन्‍री निकोल्स 12 ( गो. कुलदीप. झे. केदार जाधव), मिचेल सॅंटनर 14 (पायचीत. गो.शमी), डी ब्रेसवेल 7 (त्रिफळा ,गो. कुलदीप), लॉकी फर्ग्युसन (यष्टीचीत गो. कुलदीप), ट्रेन्ट बोल्ट1 ( गो. कुलदीप, झे. शर्मा) टीम साऊदी नाबाद 9 धावा.
भारत : 2 बाद 156, – रोहित शर्मा11 ( गो. ब्रेसवेल, झे. गुप्टिल), विराट कोहली 45 ( गो. फर्ग्युसन, झे. लॅथम), शिखर धवन नाबाद 75, अंबाती रायुडू नाबाद 13.

बळींचे शतक पूर्ण करत शमीने केला विक्रम

मागील दोन वर्षात मोहम्मद शमीला एकदिवसीय सामन्यात फारशी संधी मिळाली नव्हती. परंतु, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यात मिळालेल्या संधीचे सोने करताना त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात तीन बळी घेतले आणि भारतासाठी सर्वात जलद 100 बळी घेण्याचा विक्रमही नोंदवला. ही कामगिरी त्याने 55 सामन्यांत केलीे. या अगोदर हा विक्रम इरफान पठाणच्या नावे होता. त्याने 59 सामन्यांत अशी कामगिरी केली होती.

शिखर धवन पाचहजारी मनसबदार

सलामीवीर फलंदाज शिखर धवनने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 75 धावांची खेळी करताना एकदिवसीय सामन्यात 5000 धावांचा पल्ला गाठला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा 13 वा फालंदाज ठरला आहे. तर भारतासाठी सर्वात जलद 5000 धावा करणारा तो विराट कोहलीनंतर दुसरा फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने 5000 धावा करण्यासाठी 114 एकदिवसीय सामने खेळले होते. तर शिखरने ही कामगिरी 118 सामन्यांत केली. सौरभ गांगुलीने यासाठी 124 सामने, महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीर यांनी 135 सामने खेळले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)