भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार पं. केशव गिंडे यांना घोषित

मुंबई:  राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या भारतरत्न पं.भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार २०१८ साठी ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव गिंडे यांच्या नावाची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबई येथे केली.

प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारास भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप रु. ५ लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली उस्मान खान, सदानंद नायमपल्ली, शाम गुंडावार, श्रीमती भारती वैशंपायन, बाळ पुरोहित आणि श्रीमती शुभदा पराडकर यांच्या समितीने या पुरस्कारासाठी ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव गिंडे यांची शिफारस केली होती.  यापूर्वी हे पुरस्कार गानसरस्वती किशोरी आमोणकर,पं.जसराज, श्रीमती प्रभा अत्रे, पं.राम नारायण, श्रीमती परवीन सुलताना आणि श्रीमती माणिक भिडे यांना प्रदान करण्यात आलेला आहे.

पं.केशव गिंडे यांचा जन्म ५ सप्टेंबर, १९४२ साली पुणे येथे झाला.  संगीतामध्ये त्यांनी पी.एच.डी केली आहे. त्यांना बासरी वादनामध्ये अधिक रस होता. बासरीवादनाचे शिक्षण त्यांनी गुरु स्व. पं. देवेंद्र मुर्डेश्वर, पं. हरिपद चौधरी यांच्याकडे घेतले. पं. केशव गिंडे यांनी देशात आणि परदेशात आयोजित होणाऱ्या संगीत मैफिलीत तसेच आकाशवाणी आणि दूरदर्शन वर अनेक राष्ट्रीय संगीत सभेत सहभाग घेतला. तसेच परदेशातील विद्यापीठात मास्टर डिग्रीच्या मुलांना प्रात्याक्षिकासह शास्त्रीय संगीताची व्याख्याने  दिलेली आहेत.

पं.केशव गिंडे यांनी वेदकाळापासून चालत आलेल्या बासरीमध्ये अभूतपूर्व परिवर्तन केलेले आहे. आणि त्यांनी आपल्या दादागुरु पं.पन्नालाल घोष यांच्या पाऊलखुणांवर चालत ‘केशव वेणू’ या बासरीची निर्मिती १९८४ साली केली आहे. या बासरीची नोंद  ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ तसेच ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ मध्ये घेण्यात आली आहे. ही बासरी सात सप्तकात वाजवण्याचा गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. रसिक जन, संगीत तज्ञ,समीक्षक तसेच बासरी वादकांनी या नव्या संशोधनाचा गौरव केला आहे आणि येणाऱ्या बासरी वादकांसाठी ही बासरी आदर्श राहील असे वर्णन केले आहे.

पं.केशव गिंडे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. पं.केशव गिंडे हे अमूल्य ज्योती पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष असून संगीत आणि बासरीचा प्रचार-प्रसार-प्रबोधन, संशोधन व संवर्धन याचे कार्य अनेक बासरी वादक शिष्यांच्या सहकार्याने करत आहे.

श्री.गिंडे यांना भारत सरकारद्वारे सिनियर फेलोशिप, सहारा इंडिया यांच्याकडून जीवनगौरव पुरस्कार जगद्गुरु शंकराचार्य श्रृंगेरी महपीठ यांनी वेणू विद्वान पदवी देऊन गौरविले आहे. 4 तपाहून अधिक काळात श्री.गिंडे यांच्याकडे हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)