‘भामा-आसखेड’ रखडणारच

गेल्या दोन वर्षात १८ कोटींनी वाढला प्रकल्पाचा खर्च : काम पुन्हा बंद

पुणे – पूर्व पुण्याला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेडून सुरू असलेल्या भामा-आसखेड योजनेच्या जॅकवेलचे काम अद्यापही बंदच आहे. राज्यात सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर या कामासाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेस देण्यात आले होते. मात्र, ग्रामस्थ पुनर्वसनाच्या मागणीसाठी आक्रमक झाल्याने हे काम अद्यापही सुरू झालेले नाही. दरम्यान, हे काम वारंवार बंद पडत असल्याने, कामास उशीर होत असून त्याचा फटका पालिका प्रशासनास बसण्याची शक्‍यता आहे. या कामास दिरंगाई होत असल्याने या प्रकल्पाचा खर्च गेल्या दोन वर्षांत 18 कोटींनी वाढला असून तो महापालिकेने द्यावा, अशी मागणी ठेकेदार कंपन्यांकडून करण्यात आली असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

-Ads-

पूर्व पुण्यासाठी भामा-आसखेड धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी काम सुरू आहे. त्यात वाकीतर्फे वाडा या गावात जॅकवेल बांधण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी प्रकल्पग्रस्तांनी हे काम अडविल्याने ते बंद होते. त्याचा परिणाम प्रकल्पाच्या खर्चावर पडत असल्याने तत्कालिन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन 1,700 मिमी व्यासाची जलवाहिनी तसेच जॅकवेलचे काम सुरू करण्यास प्रकल्पग्रस्तांनी मान्यता दिली होती. त्यानंतर पुन्हा दि. 22 मार्च ते 21 एप्रिलदरम्यान या जॅकवेलचे काम आंदोलकांनी बंद पाडले होते. त्यावर काम बंद पाडल्यास आंदोलकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने हे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर 5 ऑगस्टपासून प्रकल्पग्रस्तांनी जॅकवेलचे काम बंद पाडले आहे. त्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली असून काम बंद राहिल्यास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे महापालिकेने जिल्हा प्रशासन आणि ग्रामीण पोलिसांना पत्र पाठवून बंदोबस्ताची मागणी केली होती. मात्र, मराठा आंदोलनामुळे बंदोबस्त देण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शविली होती. तर, या प्रश्‍नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविलेल्या बैठकीत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याने जिल्हा प्रशासनाकडूनही अद्याप महापालिकेस काहीच कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे या योजनेचे काम अनिश्‍चित काळासाठी बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पालिकेकडे 38 कोटींची मागणी
ही योजना सुमारे 374 कोटींची असून प्रकल्पग्रस्तांकडून वारंवार काम बंद पाडले जात असल्याने महापालिकेचा सुमारे 1 ते दीड वर्षाचा वेळ वाया गेला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाचा खर्चही वाढला असून महापालिकेने या वाढीव खर्चापोटी 38 कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी प्रकल्पाचे काम देण्यात आलेल्या दोन्ही ठेकेदार कंपन्यांकडून करण्यात आले असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यातच जलसंपदा विभागानेही पालिकेकडे 162 कोटींच्या सिंचन पुनर्स्थापना खर्चाची मागणी केली असल्याने ही योजना महापालिकेस चांगलीच महागात पडण्याची शक्‍यता आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)