दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय


शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर प्रकल्पग्रस्त अधिक आक्रमक

पुणे – भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने आपल्या मागण्यांसाठी धरणात जलसमाधी घेतल्याने, धस्तावलेल्या जिल्हा प्रशासनाकडून धरणाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे तसेच पालिकेने पाणीपुरवठा योजनेसाठी पोलिसांकडे मागितलेला बंदोबस्त गणेशोत्सवामुळे उपलब्ध करून देता येणार नसल्याचे पोलिसांकडून महापालिकेस कळविण्यात आले आहे. त्यामुळे तूर्तास या योजनेचे काम बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रकल्प व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

पूर्व पुण्यासाठी भामा-आसखेड धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी काम सुरू आहे. त्यात वाकीतर्फे वाडा या गावात जॅकवेल बांधण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी प्रकल्पग्रस्तांनी हे काम अडविल्याने ते बंद होते. त्याचा परिणाम प्रकल्पाच्या खर्चावर होत असल्याने तत्कालिन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी प्रकल्पग्रस्तांची बैठक घेतली होती. त्यात 1,700 मिमी व्यासाची जलवाहिनी तसेच जॅकवेलचे काम सुरू करण्यास प्रकल्पग्रस्तांनी मान्यता दिली होती. त्यानंतर पुन्हा दि.22 मार्च ते 21 एप्रिलदरम्यान जॅकवेलचे काम आंदोलकांनी बंद पाडले होते. त्यावर काम बंद पाडल्यास आंदोलकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने हे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर आता पुन्हा रविवारपासून प्रकल्पग्रस्तांनी जॅकवेलचे काम बंद पाडले आहे. त्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली असून काम बंद राहिल्यास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे महापालिकेने पत्र पाठवून बंदोबस्ताची मागणी केली होती.

मात्र, मराठा आंदोलनामुळे बंदोबस्त देण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शविली होती. त्यानंतर पोलिसांकडून स्वातंत्र्यदिनाचे कारण पुढे करण्यात आले. मात्र, आता ऑगस्ट संपला, तरी पोलिसांकडून बंदोबस्त मिळत नसल्याने या योजनेचे काम बंदच आहे. त्यातच तीन दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याने आपल्या मागण्यांसाठी धरणात आत्महत्या केली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त अधिकच आक्रमक झाले असून महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात काम सुरू केल्यास स्थिती चिघळण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन तसेच महापालिकेनेही माघार घेतली आहे. तसेच, जिल्हा प्रशासनाने पुन्हा शेतकऱ्यांकडून टोकाचे पाऊल उचलले जाऊ नये म्हणून धरणाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)