भामा-आसखेड धरणग्रस्तांची दिवाळी गोड

30 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर न्याय मिळाली : बाधित 75 शेतकऱ्यांना जमीनवाटप

राजगुरुनगर – भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या 30 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर भामा आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्याने त्यांची दिवाळी तीस वर्षांनी गोड होणार आहे. जमिनी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आज मोठा आनंद पाहायला मिळाला. उच्च न्यायालयाच्या आदेशाने सरुवातील 388 धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्यापैकी आज 22 भूमिहीन व 53 अल्पभूधारक शेतकरी अशा 75 शेतकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात जमीनी वाटप करण्यात आल्या. धरणग्रस्त शेतकऱ्यांना 30 वर्षे लढा दिला त्याला न्याय देणारे सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भामा-आसखेड धरणांतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या संपादित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यात पर्यायी जमिनीचे वाटप करणेकामी त्वरित कारवाई करण्याचे अधिकार सहाय्यक जिल्हाधिकारी तथा खेडचे प्रांत आयुष प्रसाद यांना प्रदान करण्यात आले होते. त्या अनुषंगाने प्रसाद यांनी बुधवारी (दि. 31) राजगुरुनगर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 388 धरणग्रस्त शेतकऱ्यांपैकी 22 भूमिहीन शेतकरी व 53 अल्पभूधारक शेतकरी अशा 75 शेतकऱ्यांना खेड व दौंड तालुक्‍यातील 101.93 हेक्‍टर जमीन वाटप केले. प्रांत अधिकारी आयुष प्रसाद, आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते जमिनीच्या कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार सुमित्रा आमले, गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, पुनर्वसन विभागाच्या तहसीलदार कल्पना ढवळे, नायब तहसीलदार लतादेवी वाजे, पोलीस उपअधीक्षक गजानन टोन्पे, शेतकरी नेते लक्ष्मण पासलकर, जि. प. सदस्य अतुल देशमुख, पं. स. सदस्य चांगदेव शिवेकर, अॅड सुधीर मांजरे, एल. बी. तनपुरे यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी भामा आसखेड धरणग्रस्त शेतकरी गंगुबाई मारुती येवले (वय 90) या धरणग्रस्त महिला शेतकऱ्याला जमीन वाटप झाल्याचे कागदपत्र देण्यात आले.

भामा-आसखेड धरणासाठी पूर्ण जमिनी गेलेल्या व आता भूमिहीन असलेल्या शेतकऱ्यांना जमीन वाटपात प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर अल्पभूधारक शेतकऱ्यांना वाटप जमीन करण्यात येणार आहे.

खेड, दौंड तालुक्‍यातील जमिनींचे वाटप
खेड तालुक्‍यात सध्या नाणेकरवाडी (1.74 हेक्‍टर), काळूस (13.74 हेक्‍टर), कडाचीवाडी (0.99 हेक्‍टर), आसखेड बुद्रुक (7.05 हेक्‍टर), गोनवडी (2.96 हेक्‍टर), रासे (1.19 हेक्‍टर), कोरेगाव खुर्द (8.10 हेक्‍टर) अशी खेड तालुक्‍यातील सात गावांतून 35.77 हेक्‍टर जमिनीचे वाटप केले जाणार आहे. तर दौंड तालुक्‍यातील दहिटणे गावातील (26.11 हेक्‍टर), पाटेठाण गावातील 44.05 हेक्‍टर अशी 66. 16 हेक्‍टर जमीन वाटप करण्यात येणार आहे. खेड व दौंड तालुक्‍यातील मिळून 101 हेक्‍टर 93 आर जमीन धरणग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.

आजचा दिवस हा तालुक्‍यातील नव्हे; तर राज्यातील ऐतिहासिक दिवस आहे. भामा आसखेड धरणातील 388 पैकी 75 शेतकऱ्यांना आज जमिनीच्या बदल्यात जमिनी देण्यात आल्या आहेत. गेली 30 वर्षांचा हा प्रश्न मार्गी लागला आहे. धरणग्रस्त शेतकऱ्यांना खेड आणि दौंड तालुक्‍यात जमिनी दिल्या आहेत. त्यांच्या मागणी नुसार जमिनी दिल्या आहेत. आदेश व सातबारा शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. उर्वरीत काम सुरू राहणार असून राहिलेल्या धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यात येणार आहे. जमिनीचा ताबा दिवाळी नंतर देण्यात येणार आहे. यासाठी एका समितीची नियुक्ती करून स्थानिक सदस्यांची निवड केली जाणार आहे.
-आयुष प्रसाद, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी


हा निर्णय ऐतिहासिक आहे, राज्यातील हा पहिला निर्णय आहे. दोन वर्षे सलग आंदोलन करीत आहोत, हे त्याचे यश आहे. 1700 लोक धरणग्रस्त आहेत. त्यांना जमिनी मिळणार आहे. तालुक्‍यातच जमिनीची मागणी होती; मात्र दौंड येथे दिले तेही मान्य केले आहे. जे शेतकरी न्यायालयात गेले नाहीत त्यांना आर्थिक पॅकेज द्यावे. धरणातील पाणी शेतकऱ्यांना मिळावे. शेतकऱ्यांचे प्रश्नांना प्राधान्य द्यावे. प्रखर संघर्ष केल्याने आंदोलनाला यश आले.
-सत्यवान नवले, शेतकरी आंदोलनाचे प्रमुख तथा लाभधारक शेतकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)