भामचंद्र नगर शाळेत केवळ दोनच शिक्षक

एक शिक्षक प्रशासकीय कामात व्यस्त : विद्यार्थी संख्या वाढल्याने एका अतिरिक्‍त शिक्षकाची मागणी

शिंदे वासुली- भामचंद्र नगर, वासुली (ता. खेड) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढल्याने सध्याच्या दोन्ही शिक्षकांवर कामाचा अतिरिक्‍त ताण येतो आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी संचमान्यते नुसार खेड पंचायत समितीकडे अतिरिक्‍त शिक्षकाची मागणी केली आहे.
भामचंद्र नगरची शाळा द्विशिक्षकी असून इथे 1 ली ते 4 थीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. या भागामध्ये कारखानदारीमुळे नागरिकरणात झपाट्याने वाढत होत आहे. भामचंद्रनगर हे चाकण एमआयडीसी टप्पा क्र. दोन मधील मध्यवर्ती ठिकाण असून कामानिमित्त आलेल्या कामगारांना सर्वात जवळचे ठिकाण आहे. त्यामुळे 2017 -18 मध्ये अवघी 21 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत आज सुमारे 70 ते 80 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे येथील शिक्षकांवर अतिरिक्‍त ताण येतो आहे. याशिवाय येथील एक शिक्षक सतत शाळा संबंधित प्रशासकीय कामांमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो आहे.
भामचंद्र नगर शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी जुलै 2018 मध्येच जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील व पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर यांचेकडे अतिरिक्त शिक्षकाची मागणी केली होती. दरम्यान भामचंद्र नगर शाळेमधील एका कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी संचमान्यता झाल्यानंतर तालुक्‍यातील रिक्त जागा भरणार असून त्यावेळी भामचंद्र नगर शाळेसाठी अतिरिक्‍त शिक्षक देता येणार असल्याचे सांगितले होते. माजी उपसरपंच सुरेश पिंगळे देशमुख यांनी सांगितले की, आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भामचंद्र नगर शाळेला विविध भौतिक सुविधा देण्याचे काम करत आहोत. परंतु शाळेला सध्या एका शिक्षकाची नितांत गरज असून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी जातीने लक्ष घालून तातडीने शिक्षक नेमणूक करावी अशी विनंती केली आहे.

  • तालुक्‍यात 47 पैकी केवळ 8 च जागांवर नेमणुका
    खेड तालुक्‍यातील शाळांसाठी संचमान्यता ऑक्‍टोबर 2018 मध्ये झाली आणि 26 फेब्रुवारीला तालुक्‍यातील शाळांमधील शिक्षकांच्या रिक्‍त जागा भरल्या गेल्या. आश्‍चर्याची बाब म्हणजे तालुक्‍यातील शाळांमधील एकूण 47 रिक्‍त जागांपैकी फक्‍त 8 शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांचा तुटवडा असलेला शिक्षण विभाग अतिरिक्‍त शिक्षक नेमणूक कशी करणार असा प्रश्‍न येथील ग्रामस्थांना पडला आहे.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)