भातपीकची काळजी घ्या!

कृषी विभागाचे आवाहन : मावळ परिसरात भात पीक जोरात
इंदोरी – पूर्व मावळ परिसरात भात पीक जोरात आले आहे. शेतकऱ्यांनी भात पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रोग नियंत्रण संदर्भात काळजी घेतली, तर नक्‍कीच यावर्षी भात पिकातून अधिक उत्पन्न शेतकरी राजाला भेटण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भातपिकाची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

आपल्या देशातील बहुतांश लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्न घटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो. तसेच अन्य पिकांच्या तुलनेत पशु-पक्ष्यांचे खाद्य व औद्योगिकदृष्ट्‌या देखील भाताचे अनेक उपयोग होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. त्याची लागवड देखील मावळ तालुक्‍यात अधिक प्रमाणात केली जाते.

मावळ तालुक्‍यातील इंद्रायणी भात प्रसिद्ध आहे. तालुक्‍यात भात पिकाला हेक्‍टरी उत्पादकता वाढवण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या विशेषतः सुधारित भात जातींच्या लागवडीखालील क्षेत्रात थोड्या फार प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. परंतु अधिकाधिक शेतकरी हे पारंपरिक पद्धतीनेच लागवड करीत आहेत.सुधारित पद्धतीने केलेल्या लागवडीतून भरघोस उत्पन्न शेतकऱ्यांना भेटत आहे.परंतु काही शेतकऱ्यांना या पद्धतीची माहिती नसते, तर काही सुधारित पद्धतीने लागवड करण्यास टाळाटाळ करताना दिसून येत आहे.

शिफारशीनुसार सेंद्रीय व रासायनिक खतांच्या मात्रांचा संतुलित वापर, मशागतीचे व लावणीचे योग्य तंत्रज्ञान, पीक संरक्षण उपायांचा अवलंब आदी बाबींवर विशेष भर दिल्यामुळे भात पिक या वर्षी चांगले उत्पन्न मिळवून देईल, अशी अशा शेतकरी राजाला आहे.

मावळ परिसरात काही तुरळक ठिकाणी वेळेवर व पुरेशा प्रमाणात शेतमजुरांच्या उपलब्धतेतील अडचणी आणि त्यामुळे रोप लावणी करताना लागणारा अधिक कालावधी यामुळे भात पिकाची उत्पादकता कमी होण्याची शक्‍यता आहे. तसेच आंदर मावळ, नाणे मावळ आदी परिसरात भात पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यासाठी योग्य औषध फवारणी, रोग नियंत्रण काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी केले आहे. तर पूर्व मावळ परिसरात असे रोग अद्याप निष्पन्न झाले नाही, असेही ते बोलताना म्हणाले. योग्य काळजी घेतली तर या वर्षी भातपीक शेतकऱ्यांना नक्‍कीच विक्रमी उत्पन्न मिळवून देईल. तसेच तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धती पेक्षा सुधारित पद्धतीच अवलंब करावा, असे आवाहन ढगे यांनी केले.

यंदा पावसाने हजेरी उशिरा लावली असली तरी जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या योग्य प्रमाणातील पर्जन्य व समप्रमाणात विभागून पडलेले पर्जन्य दिवस यामुळे भातपीक चांगले आले आहे. याशिवाय भात उत्पादक शेतकऱ्यांनी सुधारीत अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणांची (इंद्रायणी व फुले समृद्धी) वेळेत सुधारीत पद्धतीने लागवड (योग्य वयाची, योग्य प्रमाणात व ओळीत) व सुयोग्य खत व्यवस्थापन, एकात्मिक किड व रोग नियंत्रण केल्याने भात पिक उत्तम आलेले आहे.
– डॉ. नरेंद्र काशिद, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, वडगाव मावळ.

भात पिकाचे अधिक उत्पादनासाठी योग्य सुधारित जातीचे प्रमाणित बियाणे वापरणे आवश्‍यक आहे. तसेच ते दर तीन वर्षांनी बदलने देखील आवश्‍यक आहे. प्रमाणित बियाणे उपलब्ध न झाल्यास बियाण्याची पेरणीपूर्व प्रक्रिया करणे अत्यंत जरुरीचे आहे. तसेच कीड, रोग व तण नियंत्रण उपायांचा योग्य प्रमाणात वापर केला पाहिजे.
– मंगेश ढोरे,
भात उत्पादक शेतकरी

मावळ तालुक्‍यात फक्‍त 20 ते 25 टक्‍के शेतकऱ्यांनी सुधारित पद्धतीने भात लागवड केली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी सुधारित पद्धतीने लागवड संदर्भात माहिती काढून लागवड केली पाहिजे. पारंपरिक लागवडीपेक्षा नक्‍कीच अधिक उत्पन्न हे सुधारित पद्धतीने केलेल्या लागवडीस मिळेल.
– देवेंद्र ढगे
तालुका कृषी अधिकारी मावळ.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)