पिंपरी– गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात मोशीतील नागेश्‍वर महाराज उपबाजारातील फळभाज्यांची एकूण आवक घटली आहे. या आठवड्यात एकूण 883 क्विंटल फळभाज्या व 21 हजार 130 जुड्या पालेभाज्यांची आवक झाली आहे. फळभाज्यांची आवक 109 क्विंटलने तर पालेभाज्यांची आवक एक हजार 730 जुड्यांनी घटली आहे. गौरी-गणपतीच्या सणामुळे भाज्यांची मागणी अधिक असल्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, परंतु ठोक बाजारात जास्त भाव वाढले नाहीत.

बटाट्याची 11 क्विंटल आवक झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत 250 क्विंटलची घट झाली आहे. भावात 250 रुपयांची वाढ झाली. कांद्याची आवक नऊ क्विंटलने वाढून भाव 100 रुपयांनी वधारले आहेत. भेंडीची आवक तीन क्विंटलने घटूनही भावात 350 रुपयांची घट झाली आहे. गवारीची आवक दोन क्विंटलने घटून, भाव 250 रुपयांनी वधारले आहेत. तसेच टोमॅटोची आवक स्थिर राहून, भावात किरकोळ 50 रुपयांची वाढ झाली. मटारची आवक पाच क्विंटलने वाढूनही भाव 1000 रुपयांनी वाढले आहेत. घेवड्याची आवक तीन क्विंटलने घटून भाव 500 रुपयांनी घटले. दोडक्‍याची आवक सहा क्विंटलने वाढून, भाव 500 रुपयांनी वधारले. लसणाची आवक 12 क्विंटलने घटून, भाव मात्र 500 रुपयांनी वधारले. आल्याची आवक दोन क्विंटलने वाढून, भाव मात्र स्थिर राहिले आहेत. मिरचीची आवक चार क्विंटलने वाढून, भाव मात्र स्थिर राहिले. दुधी भोपळ्याची आवक नऊ क्विंटलने वाढून, भाव मात्र स्थिर राहिले. कारल्याची आवक एक क्विंटलने वाढून, भावात 200 रुपयांची घट झाली आहे.

गाजराची आवक दोन किंटलने वाढून, भाव मात्र 250 रुपयांनी घटले आहेत. फ्लॉवरची आवक 32 क्विंटलने वाढून भाव मात्र 250 रुपयांनी घटले आहेत. कोबीची आवक 11 क्विंटलने वाढून भावात किरकोळ 50 रुपयांची घट झाली आहे. वांग्याची आवक सात क्विंटलने वाढली असून, भावात 500 रुपयांची घट झाली आहे. लिंबाची आवक 24 क्विंटलने वाढलेली असतानाही भावात 500 रुपयांची वाढ झाली आहे. मका कणीसची 54 क्विंटल आवक वाढून, भावही 50 रुपयांनी वाढले आहेत.
शेवग्याची आवक तीन क्विंटलने घटून, भावात 600 रुपयांची घट झाली आहे. ढोबळी मिरचीची आवक तीन क्विंटलने घटून, भाव 250 रुपयांनी घसरले. डांगरची आवक पाच क्विंटलने वाढून, भाव 100 रुपयांनी घटले. तोंडल्यांची आवक एक क्विंटलने वाढून, भाव 250 रुपयांनी वधारले आहेत. बीटची आवक एक क्विंटल घटून, भावात 50 रुपयांची घट झाली आहे. पावट्याची चार क्विंटल आवक घटून, भाव 250 रुपयांनी घटले. याशिवाय चवळीची दोन क्विंटल आवक घटून, भावात 50 रुपयांची घट झाली. घोसावळ्याची एक क्विंटलने घटून, भाव 100 रुपयानी घटले आहेत. भुईमुग शेंगांची आवक तीन क्विंटलने घटून, भाव 250 रुपयांनी घटले. तसेच पापडीची एक क्विंटल आवक होऊन, भाव 1500 रुपयांवर स्थिरावले आहेत.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीच्या सहा हजार 660 जुड्यांची आवक झाली. तर मेथीची पाच हजार 420 जुड्या आवक झाली आहे. याशिवाय शेपूची तीन हजार 930 जुड्या, मुळे 360 जुड्या, पुदीना एक हजार 180 जुड्या, पालक दोन हजार 670 जुड्या, तर कांदापातीच्या 850 जुड्‌यांची आवक झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)