भाजीमंडईतील गाळ्यांचा लिलाव ठरला “फ्लॉप शो’

तिसऱ्या वेळीही नागरिकांची फिरवली पाठ : पालिकेने सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे

कराड – येथील छ. शिवाजी भाजी मंडईसह अन्य ठिकाणच्या राहिलेल्या 109 गाळ्यांच्या लिलावासाठी शासकीय नियमाप्रमाणे शुक्रवारी तिसऱ्यांदा लिलाव करण्यात आला. परंतु या लिलावासाठीही नागरिकांनी पाठ फिरवल्याने गाळ्यांचा लिलाव होऊ शकला नाही. त्यामुळे भाजीमंडईतील गाळेलिलाव फ्लॉप शो ठरल्याची चर्चा शहरात सुरु होती.

याबाबत मुख्याधिकाऱ्यांना विचारले असता शासकीय नियमाप्रमाणे तीन लिलाव करण्यात आले आहेत. त्यानंतर हा विषय पालिकेच्या मासिक सभेत घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या लिलाव प्रक्रियेवेळी मुख्याधिकारी यशवंत डांगे, विरोधी पक्ष नेते सौरभ पाटील, नगरसेवक विजय वाटेगावकर, वैभव हिंगमिरे, करवसुली अधिकारी उमेश महादर उपस्थित होते.

येथील छत्रपती शिवाजी भाजी मंडईत सात वर्षापासून गाळे पडून होते. भाजी मंडईतील नव्या इमारतीच्या काही गाळ्यांची अनामत रक्कम भरली गेली नसल्याने ते बंद अवस्थेत होते. गेल्या पंचवीस दिवसांपूर्वी पहिल्यांदा गाळ्यांचा लिलाव करण्यात आला. एकूण 114 गाळ्यांपैकी सातच गाळ्यांचा त्यावेळी लिलाव झाला होता. इतर गाळ्यांना कोणाकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने पंधरा दिवसांच्या फरकाने पुन्हा फेरलिलाव करण्यात आला. त्यावेळी मंडईतील 107, आण्णाभाऊ साठे शॉपिंग सेंटरमधील दोन तर सुपर मार्केटमधील तीन हॉलचा फेरलिलाव करण्यात आला. यावेळी 107 मधील तीन गाळ्यांचा लिलाव झाला.

उर्वरित 109 गाळ्यांच्या लिलावासाठी नगरपालिकेने मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी पुन्हा प्रक्रिया राबवली. मात्र यावेळी नागरिकांनी पूर्णत: पाठ फिरवल्याने पालिकेचा गाळे लिलाव फ्लॉप शो ठरला. मुख्याधिकारी डांगे यांनी याबाबत पालिकेच्या मासिक सभेत विषय घेऊन तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र हा विषय सभेत घेण्यापेक्षा याठिकाणी सुविधा पुरविल्यास एकही गाळा शिल्लक राहणार नाही. तसेच पालिकेच्या उत्पन्नातही वाढ होईल. यावर विचार होणे गरजेचे असल्याचे नागरिकांमधून बोलले जात होते.

या आहेत अपुऱ्या सुविधा…
शॉपिंग सेंटरमधील वरच्या गाळ्यांवर जाण्यासाठी जिण्याची सोय नाही.
शौचालयाची व्यवस्था नाही.
शॉपिंग सेंटर सोडून इतरत्र बसणाऱ्या भाजी व्यावसायिकांची वेगळी सोय करणे गरजेचे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)