सातारा- भाजप होतोय जिल्ह्यात मोठा भाऊ

सम्राट गायकवाड

सातारा – राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ असा दावा खा.संजय राऊत यांनी केला असला तरी सातारा जिल्ह्यात मात्र भाजप आता मोठ्या भावाची जागा घेताना दिसून येतोय. भाजपने केलेली बुथ बांधणी आणि पक्षाच्या मंत्र्यांकडून मिळत असलेल्या पाठबळामुळे संघटनेची जोरदार बांधणी होत आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेत पदाधिकाऱ्यांमधील विसंवाद अन्‌ पालकमंत्र्यांकडून चार वर्षात न मिळालेल्या पाठबळामुळे सेना बॅकफुटवर गेली आहे.

मागील विधानसभेच्या निवडणुकीत भाजप अन्‌ शिवसेना स्वबळावर लढले. भाजपला एकाही जागेवर यश मिळाले नसले तरी त्यांच्या उमेदवारांना मिळालेली मते लक्षणीय ठरली. तर शिवसेनेचे जिल्ह्यात पाटण वगळता एकाही जागेवर उमेदवार निवडून येवू शकला नाही. उलट सेनेच्या आठ पैकी सात जागांवरील उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली होती. तद्‌नंतर दोन्ही पक्ष राज्यात एकत्र आले व शिवसेनेच्या मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यामध्ये साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांना संधी मिळाली. मात्र, ना.शिवतारे अन्‌ पदाधिकाऱ्यांचा समन्वय होवूच शकला नाही. परिणामी ना.शिवतारे यांच्याबाबत बहुतांश पदाधिकाऱ्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला. तो श्रेष्ठीपर्यंत कळविण्यात देखील आला. मात्र, त्यानंतर देखील संघटनवाढीच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न झाले नाहीत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, साताऱ्याची संघटनात्मक बांधणीची जबाबदारी कृष्णा खोरे महामंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील यांच्यावर सोपविण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून देखील म्हणावे असे प्रयत्न झाले नाहीत. अखेर जबाबदारी आता ना.दिवाकर रावते यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांच्या उपस्थितीत साताऱ्यात दोन वेळा बैठका घेण्यात आल्या. दोन्ही वेळी ना.रावते यांच्याकडून पदाधिकाऱ्यांची कानउघडणी करण्याच्या पलीकडे प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी खासगीत नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर पाटण तालुक्‍यात आ.शंभूराज देसाई व हर्षद कदम यांच्यात जिल्हा परिषदेच्या निवडणूकीपासून सुरू झालेल्या विसंवादाची अखेर कदम यांचे जिल्हाप्रमुखपद जाण्याने झाली.

शिवसेनेत एका बाजूला विसंवाद सुरू असताना दुसऱ्या बाजूला भाजपने मात्र चार वर्षात जिल्ह्यात जोरदार संघटन बांधणी केली. त्याचे कौतुक नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साताऱ्यातील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधताना केले. एकूणच पंतप्रधानांनी पदाधिकाऱ्यांना शाबासकीची थाप दिल्यामुळे पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्‍वास आणखी वाढला आहे. दरम्यान, येत्या दोन्ही निवडणूकीत भाजप व सेनेची युती होण्याच्या दृष्टीने संकेत मिळत आहेत. प्रश्‍न राहिला आहे तो जागा वाटपाचा. सातारा जिल्ह्याचा विचार केला तर, भाजपने कराड-दक्षिण, कराड-उत्तर, कोरेगाव, सातारा-जावली, वाई व माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार निश्‍चित केले आहेत.

उर्वरित पाटण व फलटण विधानसभा मतदारसंघापैकी पाटण मतदारसंघात नुकतेच मुख्यमंत्र्यांनी केलेले दौरा व दिलेला निधी पाहता भाजपने त्या ठिकाणी देखील आ.शंभूराज देसाई यांच्या निमित्ताने शिरकाव केला आहे. तर फलटण विधानसभा मतदारसंघात देखील भाजपचे संघटन बांधणीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्या जागेवर उमेदवार कोण एवढीच औपचारिकता आता बाकी राहिली आहे. एकूणच भाजपची चाललेली जोरदार तयारी पाहता जिल्ह्यात मोठा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न दिसून येतायत. तर येथील शिवसैनिकांवर मात्र केवळ युती होणार की नाही, याकडे अपरिहार्यपणे नजरा लावून बसण्याशिवाय पर्याय उरला नाही.

लोकसभेच्या जागा कोणत्या भावाला?

सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने जोरदार मोर्चे बांधणी करताना दोन्ही जागांवर अप्रत्यक्ष दावा सांगितला जात आहे. साताऱ्यातून पुरूषोत्तम जाधव, विक्रम पावसकर आणि खा.उदयनराजे तर माढा मतदारसंघातून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासह पर्यायाने राष्ट्रवादीतून येणाऱ्या नावाची चर्चा होताना दिसून येते. त्या तुलनेत अद्याप शिवसेनेकडे साताऱ्यात ना.नितीन बानुगडे-पाटील व माढ्यातून धवलसिंह मोहिते-पाटील हे दोनच उमेदवार आहेत. परिणामी भाजप-सेनेची युती झाली तर या दोन्ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे राहणार आहे.

शेंडफळांचे होणार काय?

महायुतीत आता थोरला भाऊ होण्यावरून भाजप व सेनेत शाब्दिक युध्द सुरू आहे. परंतु त्यापासून घटक पक्ष असलेल्या रिपाइं, रासप अन रयत क्रांती संघटनेने दूर राहणे पसंत केले आहे. रयत क्रांतीचे अध्यक्ष ना. सदाभाऊ खोत यांनी जवळपास भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. त्यामुळे ते आगामी निवडणूक माढा की हातकणंगले मतदार संघातून लढतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर रिपाइंचे अध्यक्ष ना.रामदास आठवले यांना आता सातारा ऐवजी दक्षिण मुंबईची जागा मागितली आहे. तर रासपचे अध्यक्ष ना.महादेव जानकर यांनी बारामतीतूनच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत भाजप पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधला आणि महत्वाचे म्हणजे त्या कार्यक्रमाला रासपचे आमदार राहुल कुल उपस्थित राहिले होते. तद्‌नंतर कुल यांच्या उमेदवारीच्या चर्चेने मोठा जोर धरला आहे. पार्श्‍वभूमीवर थोरल्य अन धाकट्या भावाच्या भांडणात शेंडफळांचे लाड होणार की नाही, असा प्रश्‍न आता कार्यकर्त्यांना पडू लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)