भाजप हीच ‘लक्ष्मण रेषा’

पिंपरी – भाजप-शिवसेना युती झाल्यास भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप स्वगृही राष्ट्रवादीत परतणार असल्याच्या चर्चेला उधाण आले असताना आपण भाजपसोबतच असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. मात्र, युती झाल्यास शिवसेनेसोबत राहणार का या प्रश्‍नाचे उत्तर देण्याचे खुबीने टाळत त्यांनी आपल्या स्पर्धकांना गॅसवर ठेवले आहे.

युती झाल्यास जगताप राष्ट्रवादीत परत जाऊन मावळची लोकसभा लढविणार वा मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळाले नाही, तर वेगळा विचार करणार अशा वावड्या मागील आठवड्यात उठल्या होत्या. जगताप यांनीही त्यावर मौन धारण केल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. अखेर चर्चेचा सूर व परिणाम लक्षात येताच जगताप यांनी रविवारी रात्री उशिरा आपल्या फेसबुक पेजवर एका ओळीत या उठलेल्या विविध चर्चांचे खंडन केले. आपण भारतीय जनता पक्षाव्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, शिवसेना-भाजप युती झाल्यास शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करणार अथवा नाही याबाबतच्या चर्चेला उत्तर देण्याचे त्यांनी टाळले आहे.

-Ads-

दरम्यान, राजकीय वर्तुळातील चर्चा व कार्यकर्त्यांचा सूर पाहून शहर भाजपकडूनही लक्ष्मण जगताप यांच्या वतीने खुलासा करणारे स्पष्टीकरण जारी करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, आमदार जगताप भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे 2019 मधील लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचा अंदाज निवडणुकीचा सर्व्हे करणाऱ्या काही संस्थांकडून वर्तविण्यात आला आहे. सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यासाठी विरोधकांकडून असा चुकीचा प्रचार सुरु आहे. लोकसभेच्या 2019 मधील निवडणूक लढविण्याची आमदार जगताप यांची इच्छा आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून राष्ट्रवादी आणि अन्य पक्षही हद्दपार झाले आहेत. त्यामुळेच विरोधक अस्वस्थ झाले आहेत. त्यातूनच अशा अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे. विरोधकांनी सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यासाठी अशा काही चुकीच्या सर्व्हेंचा आधार घेतला आहे. चुकीचा प्रचार आणि प्रसार करणे त्यांचा नित्याचाच उद्योग आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांनाही विरोधकांची ही खेळी माहिती झाली आहे.

भाजपाच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे झपाट्याने होत आहेत. त्याच जोरावर भाजपचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे. सर्वसामान्यांपर्यंत भाजपाला पोहचविण्यात आम्ही यशस्वी होत आहोत. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे अफवा पसरविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत असल्याचे शहर भाजपने म्हटले आहे. पक्ष बदलाच्या चर्चेवर जगताप यांनी मौन सोडल्याने त्यांच्या समर्थकांनी सुटकेचा निश्‍वास टाकला आहे.

मंत्री मंडळाच्या विस्ताराकडे लक्ष
मागील राज्य सरकारने महत्त्वाच्या महामंडळांवर नियुक्‍त्या केल्या. यामध्ये प्राधिकरण अध्यक्ष निवडीचेही घोडे गंगेत न्हाले. विद्यमान राज्य सरकारचा कार्यकाळ वर्षभर उरलेला आहे, तर केंद्र सरकारचा कालावधी साधारण आठ महिने राहिलेला आहे. आगामी वर्ष हे निवडणुकांचे आहे. आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी मंत्री मंडळाचा विस्तार करणे फायदेशीर ठरेल, अशी अटकळ भाजप पक्षश्रेष्ठींकडून बांधली जात आहे. घटस्थापनेनंतर मंत्रीमंडळाचाही विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी लक्ष्मण जगताप व महेश लांडगे हे भाजप आमदार द्वयी तीव्र इच्छूक आहेत. मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर शहरात राजकीय भूकंप होण्याची जोरदार चर्चा दोन्ही आमदार समर्थकांमध्ये आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)