भाजप-शिवसेनेत जुंपली

पिंपरी – शिवसेना गटनेत्यांच्या बालेकिल्ला असलेल्या वाकडमधील विकास कामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची भाजपने चौकशी लावल्याने शिवसेना व भाजपमध्ये कमालीची जुंपली आहे. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर जोरदार तोफ डागली. पिंपरी-चिंचवड महापालिका कोणाची जहागिरी नाही. भाजपचे आमदार पालिका ही आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखा कारभार करत आहेत. महापौरांच्या अधिकारावर गदा आणली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत सुनावले जात आहे. आमदारांना पालिका कामकाजात एवढीच ढवळाढवळ करायची असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि नगरसेवक म्हणून पालिका सभागृहात यावे. भाजपच्या शहराध्यक्षांची कार्यपद्धती विरोधकांना संपवण्यासारखी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राहुल कलाटे यांच्या प्रभाग क्रमांक 25 वाकड, पुनावळे या प्रभागातील एकूण सहा कामांचे 24 मे रोजी महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. परंतु, वाकड, पुनावळे येथील विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे निमंत्रण महापालिकेने कार्यालयीन वेळ संपल्यानंतर 10 मिनिटे उशिरा ई-मेलद्वारे दिल्याचे कारण पुढे करत याची चौकशी करण्यात यावी, असा ठराव स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला आहे. यावरुन कलाटे यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केला. या ठरावाचे कर्तेकरविते भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप हेच असल्याचा घणाघात कलाटे यांनी केला.

कलाटे म्हणाले, महापौर कोणत्या पक्षाचे नसतात. महापौर हे शहराचे प्रथम नागरिक आहेत. प्रभाग क्रमांक 25 वाकड, पुनावळे प्रभागातील विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्‌घाटन महापौरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभागातील आम्ही चार नगरसेवक उपस्थित होतो. चारही नगरसेवकांच्या विनंतीनुसार महापौरांनी शहराचे प्रथम नागरिक म्हणून कामांचे उद्‌घाटन केले. यामध्ये आमचा कोणाला डावलण्याचा हेतू नव्हता. परंतु, सत्ताधाऱ्यांनी विकास कामांमध्ये घाणेरडे राजकारण केले आहे. अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन दमदाटी करण्यात आली. हे अत्यंत चुकीचे आहे. अधिकाऱ्यांनी प्रभागातील चारही नगरसेवकांचे ऐकायचे नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावरुन सत्ताधाऱ्यांना आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे.

स्थायी समितीचे प्रवक्ते विलास मडिगेरी हे स्थायी समितीत ठराव करुन स्वत:च्या पक्षाच्या महापौरांच्या अधिकारांवर गदा आणतात. ही भाजपची केवढी दादागिरी आहे. महापौरांच्या निर्णयाची चौकशी करण्याची सूचना स्थायी समिती कशी काय देऊ शकते ? असे फुटकळ ठराव करुन सत्ताधारी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करत आहेत. अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत दमबाजी केली जाते. अधिकाऱ्यांना विनाकारण त्रास देत असाल तर ते खपवून घेतले जाणार नाही. वाकडच्या कामाचा ई-मेल उशिरा केल्याचे सांगितले जाते. मग, वाल्हेकरवाडी येथील रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनाचा ई-मेल तर साडेसहा वाजता केला. वाकडला वेगळा आणि वाल्हेकरवाडीला वेगळा न्याय का ? असा सवालही त्यांनी केला.

भाजप नगरसेवकांनाही विचारत नाही
भाजप नगरसेवकांची देखील आमच्या सारखीच परिस्थिती आहे. त्यांना देखील त्यांच्या प्रभागातील कामाचे भूमिपूजन, उद्‌घाटन करताना विचारले जात नाही. त्यांच्या मनात देखील मोठा असंतोष आहे. परंतु, ते बोलत नसून त्यांना अडचणी आहेत, असेही राहुल कलाटे म्हणाले. राष्ट्रवादीच्या काळात विरोधकांना सन्मान दिला जात होता. विरोधकांना विचारात घेऊन त्यांच्या प्रभागातील कामांचे उद्‌घाटन, भूमिपूजने केली जात होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)