भाजप निष्ठावंतांचा पुन्हा “एल्गार’

पिंपरी – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भाजपमधील नाराज निष्ठावंतांमध्ये समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातूनच शहरातील भाजपमधील सुमारे 300 निष्ठावंत कार्यकर्त्यांची अलिबाग सफर घडवून आणली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या सत्तेत पदांचा वाटा न मिळाल्याने आगामी निवडणुकीत पक्षात आपली ताकद दाखवून देवू, असा निर्धार या कार्यकर्त्यांनी केला आहे. परिणामी, निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचा हा “एल्गार’ भाजपच्या दोन्ही आमदारांची डोकेदुखी ठरणार काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपची सत्ता आली. मात्र, सत्तेची फळे चाखताना पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने निष्ठावंतांचा विचार केला नाही, या नैराश्‍यातून पक्षासाठी निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते विखुरले गेले होते. मात्र, भाजपच्या एका माजी नगरसेवकाने शहरातील 300 कार्यकर्त्यांना अलिबागची सफर घडविली आहे. त्याठिकाणी कार्यकर्त्यांनी पालिकेतील हक्काच्या पदांवर अतिक्रमण करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करण्याचा निर्धार केल्याचे समजते.

-Ads-

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर महत्त्वाच्या पदांवर पक्षातील निष्ठावंतांचा हक्क होता. मात्र, त्यांचा निभाव कुठेच लागला नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याची खदखद त्यांच्या मनात होत आहे. आपल्या हक्कांच्या पदांवर बाहेरून पक्षात आलेल्या लोकांनी अतिक्रमण केल्याची भावना त्यांच्या मनाला भेडसावत आहे. त्यामुळे पालिकेवर सत्ता येऊनही पक्षातील निष्ठावंत हिरमुसले आहेत. नाराज होऊन पक्षाचे काम केवळ नावापुरते करण्याची भूमिका ते पार पडत आहेत. अतिक्रमणीत पदांबाबतचा न्याय मागायचा तरी कोणाकडे? असा प्रश्न त्यांना पडला होता. या नैराश्‍यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी भाजपचे माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी जवळपास 300 निष्ठावंतांची एकजूट तयार केली. त्यासाठी दुर्गे यांनी अलिबागची सफर घडवली आहे.

महापालिकेतल महत्त्वाच्या पदांवर अतिक्रमण झाले हे मान्य असले, तरी आगामी कार्यकाळात या पदांचा उपयोग करून घ्यायचा असेल, तर केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असले पाहिजेत आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असले पाहिजेत. राजसत्तेची सूत्रे या दोघांच्या हातात पुन्हा एकदा सोपविली की, आपल्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पुन्हा भाजपची सत्ता येऊन महत्त्वाच्या पदांवर लोकांची कामे करण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना आहे.

दरम्यान, भविष्यात राजकीय पटलावर संधी मिळेल आणि महत्त्वाच्या पदांवर काम करण्यासाठी न्याय मिळेल या अपेक्षेने कार्यकर्त्यांमध्ये आता मनोमिलन झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा डोळ्यासमोर पाहता या एकजुटीची शिकार कोण ठरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

निष्ठावंतांनी मरगळ झटकली
अलिबाग दौऱ्यानंतर मरगळ झटकून भाजपचे निष्ठावंत कामाला लागले आहेत. 300 लोकांचा या दौऱ्यात समावेश होता. कोणी म्हणते ही सहल होती. कोणी म्हणते कार्यकर्त्यांची एकजूट तयार करण्यासाठीची बैठक होती, अशी माहिती सांगितली जात आहे. प्रत्यक्षात दोन खासगी बसेस करून हे कार्यकर्ते अलिबागला गेले होते. त्याठिकाणी बैठक घेऊन राजू दुर्गे यांनी सर्वांना समजून सांगितल्याचे समजते. एक कार्यकर्ता 100 कार्यकर्त्यांच्या समसमान आहे. त्यामुळे आगामी काळात केंद्रात आणि राज्यात भाजपचीच सत्ता येईल, अशा आणाभाका घेतल्याचेही बोलले जात आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)