भाजप नगरसेवक गायकवाड, बोईनवाड यांच्या अडचणींत वाढ

पिंपरी– महापालिकेतील भाजप नगरसेवक कुंदन गायकवाड आणि यशोदा बोईनवाड या दोघांनाही 11 ऑक्‍टोबरपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत आहे. अन्यथा तसा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. येत्या आठ दिवसांत हे दोन्ही नगरसेवक जात वैधता प्रमाणपत्र सादर करु न शकल्यास, सत्ताधारी भाजपसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.

महापालिकेतील भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड व नगरसेविका यशोदा बोईनवाड या दोघांचे जात वैधता प्रमाणपत्र पालिका प्रशासनाकडे अद्याप दाखल झालेले नाही. त्यामुळे गायकवाड व बोईनवाड यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. महापालिकेच्या निवडणुकीतील आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या नगरसेवकांना सहा महिन्यांत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत दिली होती. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील चार नगरसेवकांनी मुदतीमध्ये प्रमाणपत्र सादर केले नव्हते. त्यामुळे भाजपाच्या संबंधित चार नगरसेवकांच्या माहितीचा अहवाल महापालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे पाठविला होता. त्यामुळे चार नगरसेवकांच्या पदावर टांगती तलवार कायम होती.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये झाली होती. त्यानंतर सहा महिन्यांच्या मुदतीमध्ये 22 ऑगस्ट 2017 पर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत होती. भाजपाचे नगरसेवक कुंदन गायकवाड, यशोदा बोईनवाड वगळता मनीषा पवार आणि कमल घोलप यांनी मुदतीनंतर प्रमाणपत्र सादर केले आहे. त्यामुळे उर्वरित दोन नगरसेवकांनी जात प्रमाणपत्र मुदतीत सादर केले नसल्याचा अहवाल नगर विकास विभागाकडे अंतिम निर्णयासाठी दोनदा पाठविला होता, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी दिली. त्यानंतर राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने 27 सप्टेंबरला काढलेल्या अध्यादेशात या सर्व नगरसेवकांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ही मुदत 11 ऑक्‍टोबरला संपत आहे. या कालावधीत या दोन्ही नगरसेवकांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास, तसा अहवाल राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे, अशी माहिती आष्टीकर यांनी पत्रकारांना दिली.

चिखली प्रभाग क्रमांक एक ‘अ’ या राखीव जागेवरून भाजपाचे उमेदवार कुंदन गायकवाड निवडून आले आहेत. तर, भोसरी धावडेवस्ती, भगतवस्ती प्रभाग क्रमांक सहा एक-अ या राखीव जागेवर निवडून आलेल्या नगरसेविका यशोदा बोईनवाड यांनी दीड वर्ष झाले तरी जात प्रमाणपत्र सादर केलेले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)