भाजपाची सरशी, काँग्रेस पिछाडीवर…

1998 : बारावी लोकसभा

बाराव्या लोकसभेसाठी 1998 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुका या मध्यावधी होत्या. कारण युनायटेड फ्रंटचे सरकार फार काळ सत्तेत राहू शकले नव्हते. या निवडणुकीत कॉंग्रेसकडे सोनिया गांधी हा हुकमी एक्‍का होता. कॉंग्रेसला निवडणुकांमध्ये भरघोस शयाची अपेक्षा होती. कारण राजीव गांधी यांच्या हत्येसंदर्भात नेमलेल्या जैन आयोगाच्या अहवालाचा फायदा मिळेल अशी ठाम अटकळ कॉंग्रेसला होती. तशाच सोनिया गांधी पक्षाशी जोडल्या गेल्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांना नवी संजीवनी मिळाली होती. अर्थात, सोनियांना पक्षाचा सदस्य बनून काही महिनेच झालेले होते. तसेच सोनियांनी काहीही झाले तरी निवडणुका लढवणार नाही असे जाहीर केलेले होते.

गांधी परिवाराचा एक दिग्गज सदस्य पक्षाशी जोडला गेल्यामुळे कॉंग्रेसजनांमध्ये उत्साह दिसून येत होता. पण विरोधी पक्षांनी या मध्यावधी निवडणुका देशावर लादण्याचे खापर कॉंग्रेसवर फोडले होते आणि जैन आयोगाच्या अहवालाचाही कॉंग्रेसला फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे 12 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची ताकद वाढली. भाजपा वगळता सर्वच पक्षांना मिळालेल्या मतांची टक्‍केवारी घटली. बसपा याला अपवाद ठरला असला आणि या पक्षाला मिळालेल्या मतांची टक्‍केवारी 2.5 टक्‍क्‍यांनी वाढली असली तरी त्यांच्या जागा 11 वरुन पाचवर घसरल्या होत्या. भाजपा आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना जवळपास 26 टक्‍के मते मिळाली. मात्र गतवेळच्या तुलनेत भाजपाच्या विजयी उमेदवारांची संख्या 161 वरुन 182वर पोहोचली. कॉंग्रेसने या निवडणुकीत 17 राज्ये आणि तीन केंद्र शासित प्रदेशात चांगला विजय मिळवला. पक्षाला मिळालेली एकूण मते 3 टक्‍क्‍यांनी घसरूनही जागांमध्ये फारसा फरक पडला नाही. कॉंग्रेस 140 वरुन 141 वरच पोहोचली.

तथापि, भारतीय मतदारांनी कॉंग्रेससाठी धोक्‍याची घंटा वाजवली होती. कारण कॉंग्रेसला जबरदस्त टक्‍कर तिसऱ्या आघाडीने नव्हे तर भाजपाने दिली होती. देशभरात जनाधार तयार करणारा भाजपा हा दुसरा पक्ष म्हणून समोर आला होता. कॉंग्रेसच्या तुलनेत भाजपाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील खासदार अधिक जिंकले होते. 1996 ते 1998 या दोन वर्षांच्या काळातच कॉंग्रेस 26 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमधून घसरून 20 वर पोहोचली होती. दुसरीकडे भाजपा 12 राज्यांवरुन 21 राज्यांमध्ये विजयी झाली होती. मिळालेल्या मतांची टक्‍केवारी पाहिली तर कॉंग्रेसला 25.72 टक्‍के मते मिळाली होती, तर भाजपाने 25.38 टक्‍के मते मिळवत आपला वाढता वरचष्मा दाखवून दिला होता. निवडणूकपूर्व नियोजनामुळे भाजपाला हे यश मिळाले होते. भाजपाने निवडणुकीपूर्वीच काही घटक पक्षांशी युती केली होती.

तामिळनाडूतील अण्णाद्रमुक, ओडिशात बिजू जनता दल, कर्नाटकात लोकशक्‍ती आणि बिहारमध्ये समता पक्षासोबत भाजपाने हातमिळवणी केली होती. तसेच अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान म्हणून घोषित केल्याचाही फायदा भाजपाला झाला होता. त्याच वेळी कॉंग्रेस मात्र स्वबळावर आम्ही केंद्रात सत्ता मिळवू शकतो या भ्रमात होती. 1998 च्या निवडणुकांमुळे देशाच्या राजकारणात भाजपा आणि कॉंग्रेस हे दोन सत्तेचेध्रुव तयार झाले. तथापि, भाजपाने निवडणूकपूर्व आघाडी करून बांधलेली मोट फारशी यशस्वी होऊ शकली नाही. अवघ्या 13 महिन्यातच ही मोट फुटली. 12 मार्च 1998 रोजी 12 व्या लोकसभेची स्थापना झाली. अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्त्वाखालील आघाडीला 9 दिवसांनी शपथ देण्यात आली. ही लोकसभा 413 दिवस चालली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)