भाजपविरोधात समविचारी पक्षांशी “आघाडी’

अजित पवार यांचे संकेत : “मनसे’शी “टाळी’चा निर्णय कॉंग्रेसच्या कोर्टात

पिंपरी – सत्ताधारी भाजप-शिवसेनेची सत्ता उलथून टाकण्यासाठी समविचारी पक्षांशी हातमिळवणी करण्याबाबत राष्ट्रवादी सकारात्मक आहे. मात्र, जागा वाटपाबाबत कुणीही तुटेपर्यंत ताणू नये. तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत “आघाडी’चा निर्णय राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमधील प्रमुख लोकांना विश्‍वासात घेवूनच घेण्यात येईल. तत्पूर्वी, भेटी-गाठींबाबत तर्कवितर्क काढणे योग्य होणार नाही, असे मत माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्‍त केले.

-Ads-

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी-चिंचवडमधील शहर कार्यकारिणीची आढावा बैठक सोमवारी घेण्यात आली. त्यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाची भूमिका मांडली.

अजित पवार म्हणाले की, भाजप-शिवसेनेच्या सरकारने लोकांचा भ्रमनिरास केला आहे. लोकसभा आणि विधानसभा तोंडावर आल्या आहेत. दोन्ही निवडणुका एकत्र होणार अशीही चर्चा आहे. त्यामुळे पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. त्याद्वारे कार्यकर्त्यांनी आता निवडणुकीला सज्ज व्हावे. त्यासाठीच कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.

राज्यात राष्ट्रवादीचे सात खासदार आहेत. कॉंग्रेसचे दोन खासदार आहेत. राष्ट्रवादीचे 41, तर कॉंग्रेसचे 42 आमदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत समविचारी पक्षांना सोबत घेण्याबाबत कॉंग्रेसच्या नेत्यांना विश्‍वासात घेण्यात येईल. सध्यस्थितीला दोन्ही पक्षांमध्ये “शेकाप’सोबत आघाडी करण्याबाबत एकमत झाले आहे. त्याठिकाणी अडचण नाही. समविचारी पक्षांसोबत निवडणुका एकत्रितपणे लढण्याबाबत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांची बैठक झाली आहे. तसेच, “आरपीआय’ कवाडे गट यांच्यासोबतही चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, “मनसे’ला सोबत घेण्याबाबत कॉंग्रेसच्या नेत्यांची मते जाणून घेवूनच निर्णय येण्यात येईल. वास्तविक, जातीयवादी पक्षांना सोबत घेऊन “सेक्‍युलर’ मतांची विभागणी होणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

साधु-संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात, संत ज्ञानेश्‍वर, तुकोबारायांच्या या भूमीत मनु श्रेष्ठ होता, अशी भूमिका मांडण्याचे धाडस संभाजी भिडे यांसारख्या लोकांचे होते. त्यांना सत्तेतील लोक “क्‍लिन चिट’ देतात, हे आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
– अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री.

शहराध्यक्ष वाघेरेंना तूर्तास दिलासा
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या पदाचा कार्यकाल संपला आहे. त्यांना मावळ लोकसभेची तयारी करण्याबाबत संकेत पक्षाने दिले आहेत. नवीन कार्यकारिणी तयार करीत असताना शहराध्यक्षपदी कुणाला संधी मिळणार? याबाबत पक्षात चर्चा सुरू आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, शहराध्यक्षपदाची निवड हा पक्षांतर्गत विषय आहे. नवीन शहराध्यक्ष नियुक्‍त केला जात नाही, तोपर्यंत वाघेरे यांच्याकडेच जबाबदारी राहणार आहे. त्यामुळे वाघेरे यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. मात्र, वाघेरे यांच्या फेरनियुक्‍तीबाबत बोलणे पवार यांनी टाळले आहे. परिणामी, शहराध्यक्षपदी कुणाला संधी मिळणार? याकडे पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)