भाजपला घरचा आहेर

पिंपरी- भोसरीतील प्रभाग क्रमांक पाच गवळीनगर, संत तुकारामनगर मधील बॅडमिंटन हॉलच्या नामकरण असो, डॉ. पंडीत यांना मुदतवाढीचा विषय किंवा भोसरीतील रुग्णालय खासगी संस्थेला चालवायला देण्याचा विषय असो या सर्वच विषयांमध्ये सत्तधारी भाजपला स्वपक्षीयांचा विरोध सहन करावा लागत आहे. त्यामुळे भाजपला मिळत असलेल्या “घरच्या आहेरात’ वाढ होत आहे. या अंतर्गत धुसफुशीचा भाजपला चांगलाच फटका बसत आहे.

सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांमध्ये शह-काटशहाचे राजकारण रंगले आहे. स्वपक्षीय नगरसेविकेच्या पाठपुराव्याने वर्षभरापूर्वी नामकरणाचा मंजूर झालेले ठराव रद्द करत नवीन ठराव मंजूर करण्यात आला आहे. याच ठरावावरून भाजप नगरसेविका प्रियंका बारसे भोसरी गाववाल्यांवर सर्वसाधारण सभेत चांगल्याच बरसल्या. नामकरणाच्या विषयावरून मला एकटे पाडले आहे. तुम्ही गाववाले नाहीत म्हणून तुमचे नाव या हॉलला देता येणार नाही, असे सांगण्यात आले. गाववाल्यांच्या जागा विकासकामांसाठी आरक्षित केल्या असल्या, तरी देखील त्यांनी या जागा काही फुकट दिलेल्या नाहीत, अशा शब्दांत टीका केली. तसेच भोसरीतील बॅडमिंटन हॉल व उद्यानांमध्ये सर्रासपणे वाढदिवस, नामकरण सोहळ्याचे कार्यक्रम विना पावती अयोजित केले जातात. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या तक्रारी माझ्याकडे येत आहेत. हे सर्व बेकायदेशीर प्रकार टाळण्यासाठी या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांना सूचना देण्याची त्यांनी मागणी केली. सभागृहात भोसरीकरांविरोधात दंड थोपटण्याच्या कृतीचे विरोधी पक्षांनी स्वागत केले.

याच सर्वसाधारण सभेत भाजपच्या आशा शेडगे यांनी डॉ. पंडीत यांच्या नियुक्‍तीवरुन प्रशासनावर निशाणा साधत, डॉ. पंडीत यांचे समर्थन करणाऱ्या पदधिकाऱ्यांवर शरसंधान केले. डॉ. पंडीत यांची मुदत संपली असताना, ते स्थायी समितीच्या सभेला कसे उपस्थित राहिले? असा सवाल उपस्थित करत, नियम फक्‍त नगरसेवकांनाच आहेत का, अधिकाऱ्यांना ते लागू नाहीत का अशी विचारणा केली. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर त्यांनी सर्वसाधारण सभेलादेखील कोणाच्या परवानगीने येतात? महापालिका प्रशासन डॉ. पंडीत यांच्यावर इतके मेहेरबान, कुर्बान का आहे? 17 तारखेला मुदत संपूनही डॉ. पंडीत हे वैद्यकीय विभागाच्या कारभारात लुडबूड करत असल्याची टिका त्यांनी उघडपणे केली. तसेच यापुर्वीच्या तत्कालीन महापालिका आयुक्‍तांचा नामोल्लेख टाळत डॉ. पंडीत हे कोणत्या अधिकाऱ्याचे गुरू आहेत असाही सूर लावला. तसेच यावेळी पक्ष भूमिकेच्या विरुद्ध भूमिका घेत, शहराचे एक वर्ष नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्याला मुदतवाढ देण्यास ठाम विरोध असल्याचे सांगितले.

भोसरीतील रुग्णालय खासगी संस्थेला चालवायाला देण्याच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत मान्यता दिली असली, तरीदेखील स्थानिक भाजप नगरसेवक रवी लांडगे यांनी भ1ाजपच्या या निर्णयावर जाहिरपणे नाराजी व्यक्‍त केली. वैद्यकीय धोरणाबाबतचा महत्वाचा निर्णय घेताना स्थानिक नगरसेवकांना साधी कल्पनादेखील दिली जात नसल्याने, या निर्णयाला खुला विरोध केला आहे.

शहरातील अवैध फ्लेक्‍सविरोधात भूमिका घेत नगरसेवक तुषार कामठे यांनी थेट महापालिका मुख्यालयाच्या आवारात फ्लेक्‍स आणून टाकले होते. याशिवाय वाकड परिसरातील पाणीटंचाईच्या निषेधार्थ रहिवाशांनी महापालिका मुख्यालयावर काढलेल्या मोर्चाचे नेतृत्वदेखील त्यांनी केले होते. मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची संपूर्ण माहिती दिली जात नसल्याबद्दल भाजप नगरसेविका माया बारणे यांनी पत्रकार परिषद घेत, जाहीरपणे नाराजी व्यक्‍त केली होती.

नगरसेवकांच्या नाराजीची कारणे अनेक
महापालिका ताब्यात आली असली, तरीदेखील भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवकांमध्ये समन्वय नसल्याचे अनकेदा समोर आले आहे. महत्वाचे अथवा धोरणात्मक निर्णय घेताना विश्‍वासात घेतले जात नसल्याची या नगरसेवकांची तक्रार आहे. त्यामुळेच हे नगरसेवक थेट पक्षाच्या भुमिकेविरुद्ध दंड थोपटण्याचे धारिष्ट्य करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)