भाजप,राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची लढाई ; पाणीपुरवठा योजनेचे दोन्ही पक्षांकडून वेगवेगळे जलपूजन

शहरटाकळी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे दोन्ही पक्षांकडून वेगवेगळे केले जलपूजन

शेवगाव: निवडणुका जवळ आल्याने भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत कामांचे श्रेय लाटण्यासाठी चढाओढ लागल्याचे संकेत आहेत. आज थकीत वीजबिलामुळे बंद पडलेली शहरटाकळी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. या योजनेचे जलपूजन भाजपने सकाळी, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी स्वतंत्रपणे उरकले. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी या कामाचे श्रेय आपल्याच पक्षाचे असल्याचा दावाही केला. यापूर्वीही पाथर्डी तालुक्‍यातील पाडळी येथे विकासकामाच्या उद्‌घाटनावरून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते.

-Ads-

भाजपचे अरुण मुंढे यांनी वीजबिल थकबाकीमुळे बंद असलेल्या तालुक्‍यातील शहरटाकळी व 24 गावे, हातगाव व 29 गावे या दोन प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या राक्षी येथील उद्‌भवावर जाऊन शेवगाव व पाथर्डी तालुक्‍यांतील कार्यकर्त्यांनी जलपूजन केले.

या दोन्ही योजना सुमारे एक कोटी 66 लाख रुपयांची वीजबिलाची थकबाकी असल्यामुळे वर्षापासून बंद होत्या. आमदार राजळे यांनी याबात शासनस्तरावर पाठपुरावा करून थकबाकीच्या निम्मी म्हणजे 50 टक्के रक्कम शासनाला भरावयास भाग पाडले. उर्वरित 50 टक्के रकमेचे 30 हप्ते पाडले. त्यातील 4 लाख रुपयांची रक्कम संबंधित पाणी योजनेत सहभागी असणाऱ्या समितीने भरल्यामुळे वीजपुरवठा सुरु झाला. या योजना बंद असल्यामुळे शेवगाव व पाथर्डी तालुक्‍यातील टंचाई असणाऱ्या गावांसाठीचे 80 टॅंकरच्या 170 खेपा शेवगाव-पाथर्डी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या खंडोबा माळ येथील टाकीतून भरल्या जात होत्या.

परिणामी पाणी कमी पडत असल्याने शेवगाव व पाथर्डी शहरांत आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळत होते. म्हणून दोन्ही पालिकांच्या पदाधिकाऱ्यांनी शहरटाकळी योजनेचा उद्‌भव लवकर सुरू करावा, अशी मागणी आमदार राजळे यांचेकडे वारंवार केली होती. त्यामुळे ही योजना सुरु झाल्याचे श्रेय आमदार राजळे यांना द्यावे लागेल, असे ते म्हणाले. यावेळी पाथडीचे नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, विनोद मोहिते, माजी जि. प. सदस्य सोमनाथ खेडकर, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, भाजपचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, दिगंबर काथवटे, विष्णुपंत अकोलकर, अनिल बोरुडे, सुनील ओहोळ, नितीन दहिवाळकर, अंकुश कुसळकर, सुभाष केकाण, रमेश गोरे, हरिभाऊ झुंबड व ग्रामस्थ उपस्थित होते.

या योजना सुरू व्हाव्यात, यासाठी आमदार राजळे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करून समक्ष भेटही घेतली. सत्ताधारी असूनही आम्ही नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी खंडोबा माळ येथे गेट बंद आंदोलनही केले. एवढेच नव्हे तर शहरटाकळी पाणी योजनेचे माजी अध्यक्ष पंडीत भोसले यांनी याचे श्रेय आ. राजळे यांना दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, असे नगरसेवक मुंडे म्हणाले.

भाजपचा कार्यक्रम पार पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राक्षी येथे जाऊन जलपूजन केले. यावेळी बाजार समितीचे सभापती संजय कोळगे, उपसभापती रतन मगर, तालुकाध्यक्ष कैलास नेमाने, पाणीपुरवठा योजनेचे माजी अध्यक्ष पंडित भोसले, कृष्ण ढोरकुले, ज्ञानदेव कातकडे, विश्‍वास नन्नवरे, डॉ. सुधाकर लांडे, संतोष पावशे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. शहरटाकळी व हातगाव योजनेचे वीजबिल व दंड माफ करावेकिंवा टंचाई निधीतून द्यावे, असा ठराव पंचायत समितीने करून शासनाला पाठवला होता. त्यासाठी राष्ट्रवादीने माजी आमदार चंद्रशेखर घुले, सभापती क्षितीज घुले यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी आंदोलने केली. त्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात हा प्रश्‍न उपस्थित करून लक्ष वेधले होते. मात्र त्याची दाखल न घेता शासनाने 14 व्या वित्त आयोगातून वीजबिलासाठी 25 टक्के रक्कम वसूल केली. एका हाताने देऊन दुसऱ्या हाताने काढून घेतले, असा प्रकार केला. जिल्ह्यातील काही योजनांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी असतानाही त्यांच्यावर मात्र कारवाई करण्यात आली नाही. सध्या दुष्काळी परिस्थिती असून, भाजपने पाणी प्रश्‍नी राजकारण करू नये, असे बाजार समितीचे सभापती संजय कोळगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)