भाजपमध्ये येण्यासाठी अनेकजण रांगेत

देवेंद्र फडणवीस : निरंजन डावखरेंना भाजपकडून उमेदवारी
मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घडाळ्याची टिकटिक असह्य झालेले कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत आज भाजपामध्ये प्रवेश केला. पुढच्या महिन्यात होणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत निरंजन यांना भाजपाची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषित केले.

स्थानिक राजकारणाला कंटाळलेल्या निरंजन डावखरे यांनी बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रसच्या आमदारकीचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर आपण आपली पुढील भूमिका लवकरच जाहिर करू, असे त्यांनी सांगितले. पण त्यांच्या राजीनाम्या दिवशीच भाजप कार्यालयाकडून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे प्रसिद्ध पत्रक जाहिर करण्यात आले. त्यानुसार निरंजन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

निरंजन डावखरे यांना भाजपा प्रदेश कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी यावेळी माथाडी कामगारांचे नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नरेंद्र पाटील आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. हा धागा पकडत इतर काही नेते भाजपात येणार आहेत का असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला असता, अजून खूप जण रांगेत आहेत. लवकरच कोण भाजपात प्रवेश करणार आहे, हे तुम्हाला कळेलच, असे उत्तर दिले. तीस वर्षांपुर्वी भाजपा हा छोटा पक्ष होता. विविध क्षेत्रातील जे चांगले काम करत आहेत असे अनेक नेते भाजपात आले, पक्षाशी जोडले गेले व पक्ष मोठा झाला. त्यामुळे इतर पक्षातून भाजपात आयात होते हा वाक्‍यप्रचार वापरू नये, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

राष्ट्रीय प्रवाहात काम करण्याची आपली इच्छा होती. मुख्यमंत्री फडणवीस हे अतिशय चांगले काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक नव्या योजना, प्रकल्प आणत आहेत. यामुळेच आपण भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे निरंजन म्हणाले. निरंजन यांचे वडिल दिवंगत वसंत डावखरे हे अजातशत्रू नेते होते. तीच परंपरा निरंजन यांनी जोपासली आहे. निरंजन गेल्या काही दिवसांपासून आपल्या संपर्कात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)