भाजपमध्ये खदखद

तुषार रंधवे

पिंपरी – भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांची पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खाडेंना संधी दिल्याने भाजपातील निष्ठावान गटाला न्याय मिळाल्याची दिवंडी पिटली जात आहे. मात्र, आमदारांची शिफारस डावलून ही नियुक्ती झाल्याने या पदाकरिता इच्छूक असलेले भाजपातील बडे नेते मात्र नाराज झाले आहेत.

राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप आणि सहयोगी आमदार महेश लांडगे यांच्या नावाची मंत्रीपदाकरिता जोरदार चर्चा सुरू झाली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता आल्यानंतर, निवडणुकीत महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या या दोघांचाही दावा आणखी प्रबळ झाला. त्यानंतर आतापर्यंत मंत्री मंडळात त्यांना कोणते खाते मिळणार याची देखील खरमरीत चर्चा सुरु झाली. दरम्यानच्या काळात मंत्रीमंडळातील जिल्ह्यांचा सहभाग झाल्यानंतर महेश लांडगे यांची क्रीडा राज्यमंत्री पदासाठी तर लक्ष्मण जगताप यांचे प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाकरिता नाव घेतले जात होते. दरम्यान, भाजपचे सचिन पटवर्धन यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर देखील या दोन्ही इच्छूकांचा दावा तसूभरही कमी झाला नाही. उलट सातत्याने त्यांच्या मंत्रीपदाचीच चर्चा होत राहिली. उलट यामध्ये मावळचे भाजप आमदार बाळा भेगडे यांच्या नावाचा समावेश झाला होता.

पुणे जिल्ह्याचा विचार करता या जिल्ह्यात आतापर्यंत एका कॅबिनेटसह पाच राज्यमंत्री पदे दिली आहेत. त्यामध्ये अन्न पुरवठा मंत्री गिरीष बापट, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा समावेश आहे. तसेच लोकलेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे नवनियुक्त अध्यक्ष सदाशिव खाडे आणि महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक या तीनही पदांना राज्य मंत्री दर्जा आहे. त्यामुळे आता नव्याने या जिल्ह्याला आणखी एखादे मंत्रीपद मिळण्याच्या आशा धूसर झाली आहे.

दरम्यान, शहर भाजपमध्ये जुने-नवे असा संघर्ष कायम आहे. राज्य मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या प्राधिकरण अध्यक्षपदी आपल्या समर्थकांची वर्णी लावण्यासाठी आमदार द्वयींनी जोरदार “फिल्डींग’ लावली होती. मात्र, त्यांची शिफारस डावलून जुन्यांमधून खाडे यांना संधी देण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता खेचून आणणाऱ्या आमदार द्वयींना यानिमित्ताने जुन्यांकडून मात दिली गेली. त्याची सल आमदार द्वयींमध्ये आहे. त्यातच महत्त्वाच्या पदावर पुर्नवसन करण्याच्या शब्दावर भाजपमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनाही प्राधिकरण अध्यक्षपद न मिळाल्याने त्यांचे समर्थकही नाराज आहेत. त्यामुळे भाजपच्या कंपूत सध्या खदखद पसरली आहे.

प्राधिकरण विलिनीकरणाच्या चर्चेला विराम
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे “पीएमआरडीए’मध्ये विलिनीकरण करण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू होते. त्याला भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला. प्राधिकरणाच्या मालकीची जमीन आणि ठेवींमुळेच या विलीनीकरणाची चर्चा सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशिव खाडे यांच्या नियुक्तीने प्राधिकरणात लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या विलीनीकरणाच्या चर्चेला तुर्त विराम मिळाला आहे.

रिपाइंच्या गोटात आनंद
भाजपकडून या नियुक्‍त्यांमध्ये रिपाइं आठवले गटाच्या सुधाकर सरवदे यांची महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रात घटकपक्ष असलेल्या रिपाइंच्या पदाधिकाऱ्याला सामावून घेतल्याचे समाधान या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. या सर्व महामंडळांच्या सदस्यपदी आणखी कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याने, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)