भाजपमधील नाट्यमय घडामोडींवर अखेर पडदा

सुनीता शिंदे

कराड – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे भाजपाच्या गोटात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींवर अखेर पडदा पडल्याची चर्चा कार्यकर्त्यात सुरू आहे. मात्र आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चंद्रकांत दादांनी केलेले प्रयत्न कितपत यशस्वी ठरतील, हे त्या-त्या परिस्थितीवरूनच स्पष्ट होईल. एकंदरीतच चंद्रकांतदादांच्या वक्तव्यावरुन कराडात भाजपातील दोन गटांमध्ये सध्या तरी खेळीमेळीचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमधील टेन्शनही आता कमी झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कराड शहरात नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार व इतर चार जागा मिळवत भाजपाने पालिकेत प्रवेश केला. ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर हे गेली अनेक वर्षे हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून भाजपाशी एकनिष्ठ होऊन काम करीत आहेत. त्यांचे चिरंजीव विक्रम पावसकर यांच्यावर भाजपाची जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर मलकापूरच्या भोसले घराण्याने गत विधानसभा निवडणुकीतच भाजपाशी हात मिळवणी करीत आपली रणनिती सुरु केली आहे. खऱ्या अर्थाने तेव्हापासूनच भाजपात दोन गट पडले होते. परंतु गेली साडेचार वर्षे दोनही गटांनी कसे तरी निभावले.

पालिकेत मिळालेल्या यशानंतर केंद्रात व राज्यात असलेल्या सरकारचा फायदा घेत मोठा निधी शहराला मिळवून आणण्यात यश मिळवले. शहराच्या विकासामध्ये भोसले गटाच्या नगराध्यक्षा व भाजपा प्रणित नगरसेवक एकत्रित असल्याने सर्वकाही अलबेल आहे असे सर्वांना वाटले. मात्र स्थायी समिती सदस्यांची निवड व विशेष सभेवर भाजपाच्या नगरसेवकांनी घातलेल्या बहिष्कारानंतर दोन गटातील वाद सर्वांसमोर आले.

पालिकेत चाललेल्या भ्रष्टाचाराला विरोध असल्याने सभांवर बहिष्कार टाकल्याचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी स्पष्ट केले असले तरी यापाठीमागची कारणे काही वेगळीच आहेत हे सर्वज्ञात आहेच. कराडच्या राजकीय वातावरणावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची नेहमीच मेहेरनजर राहिली आहे. कोणत्या क्षणी कोणता पत्ता काढायचा आणि कोणता कटवायचा हे त्यांना चांगलेच जमते. परंतु सध्या तरी पत्ता कट करण्याऐवजी सगळे पत्ते एकत्रित जमा करण्यावर त्यांचा जास्त भर आहे. पक्षाने त्यांच्यावर सातारा जिल्ह्याची जबाबदारी सोपविल्याने तेथे यश खेचून आणण्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी आहे. त्यासाठीच कराडमधील भाजपाच्या दोन गटातील नाराजी दूर करण्यासाठी तसेच येत्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या मलकापूर निवडणुकीसाठी सोलापूर दौऱ्यावर असलेल्या चंद्रकांत दादांनी तिकडचा कार्यक्रम आटोपता घेत कराडकडे आगेकूच केली.

कराड येथे आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम पालिकेत चाललेल्या घडामोडी समजावून घेत त्यांच्यातील वाद मिटविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. शासकीय विश्रामगृहावर त्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या विनायक पावसकर, विद्या पावसकर, सुहास जगताप व अंजली कुंभार यांच्याशी पालिकेतील टेंडर वादाबाबत चर्चा केली. तसेच दोन्ही गटाच्या अंतर्गत असणाऱ्या वादावरही चर्चा करत त्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांचीही भेट घेत चर्चा केली.

या भेटीप्रसंगी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी महसूलमंत्र्यांनी अंतर्गत वाद संपवून कामाला लागा अशा स्पष्ट सूचना केल्या. त्यामुळे कराड पालिकेत चाललेले अंतर्गत वाद संपुष्टात येवून लवकरच सर्व अलबेल सुरू होईल यात काही शंका नाही. चंद्रकांत दादांनी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्यासोबत पुन्हा एकदा स्नेहभोजन केल्याने विधानसभेची भक्कम बांधणी सुरू असल्याचे दिसू लागले आहे. जनशक्‍ती आघाडीतील किती व कोणते नगरसेवक त्यांना साथ देतील ते येणारा काळच सांगेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)