भाजपने देशाला, राज्याला खड्यात घातले-अजित पवार

अजित पवार : रहिमतपूर येथील निर्धार परिवर्तन यात्रेत सरकारवर टीका

रहिमतपूर – देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र घोषणा करणाऱ्या भाजप सरकारने देश आणि राज्यही कर्जाच्या खड्ड्यात घातले आहे.प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याची घोषणा करणाऱ्या मोदींनी साडेचार वर्षात 83 लाख कोटी कर्ज केले तर देवेंद्र फडणीस यांनी महाराष्ट्राची तिजोरी खाली करताना साडेअकरा लाख कोटीचे कर्ज केले आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रहिमतपूर येथील निर्धार परिवर्तन यात्रेच्या सभेत केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादी कॉंग्रेसने काढलेल्या निर्धार परिवर्तन यात्रेत रहिमतपूर येथील गांधी मैदानात विराट सभा घेतली त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे,आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने, सत्यजित पाटणकर, सारंग पाटील, बाळासाहेब सोळसकर, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, महिलाध्यक्षा समिंद्रा जाधव, सभापती राजाभाऊ जगदाळे, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपनगराध्यक्ष चांदणी आतार आदी उपस्थित होते.

अजित पवार पुढे म्हणाले की, जाती-जातीत भांडणे लावायचे काम भाजपने केले आहे. आज- काल ते देवालासुद्धा जातीत अडकवत आहे. निवडणुका आल्या की यांना राम मंदिर आठवते. मोदींची थापा मारायची सवय फडणवीस यांना आणि फडणवीस यांची सवय सगळ्या मंत्र्यांना लागली आहे. आदिवासी मागास मुलींची फी भरायला पैसे देत नाहीत. शेतीमालाला दर द्यायला पैसे नाहीत, उसाच्या एफआरपीवर बोलायला एकाही मंत्र्याला वेळ नाही. परंतु आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांना पुढे घालून कार्यकर्त्यांना त्रास देण्यात भाजपाचे मंत्री धन्यता मानतात. भाजप – शिवसेनेच्या नाकर्तेपणामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्‍न मार्गी लागला नाही. पण डान्सबार मात्र सुरू झाले. गेल्या पंधरा वर्षांच्या काळात कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारने वचनपूर्तीचे राजकारण केले आहे. शेतकरी हितासाठी देशात यूपीए व राज्यात आघाडीचे सरकार येणे गरजेचे आहे.

जयंत पाटील म्हणाले, सरकारकडून खोटा व चुकीची माहिती देणारा देशव्यापी अर्थसंकल्प मांडण्याचा उद्योग सुरू आहे. हा अर्थसंकल्प मांडून तो पूर्ण करायला केवळ चार महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. या कालावधीत तो पूर्ण होणे शक्‍य नसून राज्याच्या तिजोरीत ठणठणाट आहे. लोकांना फसवणे हाच भाजप सरकारचा धंदा आहे. चुकीच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रोजगार बुडाला असून नोटाबंदी जीएसटीमुळे अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. अर्थव्यवस्थेशी संबंध नसणाऱ्याला रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नर पदावर बसवण्यात आला आहे. मनमानीपणे काम करता यावे यासाठी नियोजन आयोग गुंडाळला असून स्थानिक स्वराज्य संस्था मोडीत काढण्याचा उद्योग भाजप सरकारने केला असल्याचा घणाघात पाटील यांनी केला.

धनंजय मुंडे म्हणाले, 2014 च्या निवडणुकीत महागाई झाल्याची बोंब करून केंद्रात व राज्यात भाजपने सत्ता मिळवली. आता पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे दर बघितले तर महागाईने कळस गाठला आहे. आता यांना ही महागाई दिसत नाही का? दरवर्षी दोनशे कोटी नोकऱ्या देण्याची घोषणा करणाऱ्यांनी साडेचार वर्षात किती नोकऱ्या दिल्या याचा हिशोब द्यावा. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, नोकरभरती थांबविण्यात आली आहे, चोहीकडून सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोंडीत पकडत आहे. दिलेली कर्जमाफी फसवी आहे, धनगर आरक्षण दिले नाही मराठा आरक्षण दिले असले तरी ते टिकेल का नाही याची शाश्‍वती नाही.

गत निवडणुकीतील आपली भाषणे मोदींनीच पुन्हा पाहिली तर या निवडणुकीला ते प्रचाराला येणार नाहीत एवढी फसवी आश्‍वासने जनतेला मोदींनी दिली आहेत. सत्तेच्या मस्तीची अंतिम यात्रा काढण्यासाठीच निर्धार परिवर्तन यात्रा काढण्यातत आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील माने यांनी केले. विकास पवार यांनी सूत्रसंचालन केले तर अविनाश माने यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)