भाजपतर्फे प्रचारासाठी जादुगार अन्‌ वासुदेव

नगर – नगरकरांना आता पुढचे आठ ते दहा दिवस प्रात:काळी वासुदेवाच्या चिपळ्यांचा नाद आणि दान पावलं’ चा गजर ऐकू येणार आहे.एरव्ही दानासाठी घरोघरी फिरणारे हे वासुदेव आता मात्र मतदानाचे आवाहन’ करण्यासाठी मतदारांच्या दारी जाणार आहेत. तसेच जादुचे प्रयोग करून अबालवृद्धांचे मनोरंजन करणारे जादुगारही आपल्या कलेच्या माध्यमातून भाजपचा प्रचार करणार आहेत. या अनोख्या प्रयोगामुळे भाजपच्या प्रचार तंत्राची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे.

नगर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी एकिकडे भाजपद्वारे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जात असतानाच, विविध उपक्रमाद्वारे मराठमोळ्या संस्कृतीशी असलेले नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्नही केला जात आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून गावरहाटीचा एक महत्वाचा घटक असलेल्या वासुदेवामार्फत नगरमध्ये प्रचार करण्याची एक अभिनव संकल्पना भाजपतर्फे प्रत्यक्षात उतरवली जात आहे.

महापालिका निवडणुकीत आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी भाजपने वासुदेवांच्या एका पथकाला नगरमध्ये आमंत्रित केले आहे. प्रात:काळच्या प्रसन्न वातावरणात मतदारांना मतदानाचे महत्व सांगण्यासाठी तसेच भाजपच्या उमेदवारांची माहिती सांगण्यासाठी हे वासुदेव घरोघरी जाणार आहेत. वासुदेवाला मराठी जनमानसात एक मानाचे स्थान आहे. प्रात:काळी वासुदेवाचे दर्शन होणे हे शुभ मानले जाते. नेमकी हीच बाब हेरून भाजपने वासुदेवांमार्फतच प्रचाराचे नियोजन केले आहे. भाजपचा विकासाचा संदेश प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही या वासुदेवांवर देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे वासुदेवांसोबत जादुगाराच्या कार्यक्रमाद्वारेही उमेदवारांचा प्रचार आणि मतदानाचे आवाहन करण्यात येणार आहे. शिवाय विरोधकांच्या सत्ताकाळातील महापालिकेच्या कारभारातील त्रुटीही हे जादुगार मनोरंजक पद्धतीने मतदारांसमोर ठेवणार आहेत. जादुगाराच्या भोवती असलेल्या गुढ वलयामुळे त्याच्याबद्दल अबालवृद्धांना कायमच आकर्षण वाटत आले आहे. याच आकर्षणाचा मोठ्या खुबीने वापर करत भाजपने विविध प्रभागामध्ये जादुच्या प्रयोगांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. भाजपच्या या अनोख्या प्रचार रणनितीमुळे विरोधक भांबावले असून मतदारांमध्ये मात्र भाजपच्या प्रचार पद्धतीची जोरदार चर्चा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
2 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)