भाजपच्या सावलीखाली आयुक्‍तांची वर्षपूर्ती!

पिंपरी – “सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले’, “भाजपचे प्रवक्‍ते’, “ध्रुतराष्ट्राची भूमिका’ असे एक ना अनेक आरोप झेलणाऱ्या आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभाराची आज वर्षपूर्ती झाली. आपल्या वर्षभराच्या कारकिर्दीबाबत आपण समाधानी असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. केंद्र सरकार पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीवर भर देण्याचा संकल्पही त्यांनी यानिमित्ताने सोडला.

महापालिकेत सत्तांतराबरोबरच आयुक्तही बदलले. त्यामुळे महापालिकेतील राजकीय तसेच प्रशासकीय कारभारही बदलला. बदलीपासूनच आयुक्त हर्डीकर यांच्यावर “भाजप प्रेमाचा’ आरोप झाला. वर्षभर हा आरोप कायम राहिला. सामाविष्ट गावांमधील रस्ते विकास, गतवर्षी उन्हाळ्यात केलेली पाणी कपात, कचऱ्याची निविदा, मुख्य वैद्यकीय अधिकारी नेमणूक प्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले. आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले असल्याचीही टीका झाली. मात्र, हे आरोप हसतमुखाने झेलत आयुक्तांनी वर्षपूर्ती केली.

वर्षपूर्तीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना आयुक्त हर्डीकर यांनी शहराच्या विकास आराखड्यापासून क्रीडाक्षेत्र सक्षमीकरणापर्यंतच्या अनेक विषयांचा उहापोह केला. ते म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराचा विकास आराखडा कालबाह्य झाला होता. विकास आराखडा सुधारीत करण्यासाठी पाऊले उचलली. त्याचे काम देखील वेगात सुरु आहे. केंद्र सरकार पुरस्कृत योजना पुर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे असे सांगत आयुक्त हर्डीकर म्हणाले, महापालिका आयुक्तपदावर नियुक्तीनंतर काही दिवसांत शहराची माहिती घेतली. आगामी काळात विकास कामांचे नियोजन केले आहे. आता प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाईल. वेळेत विकास कामे पुर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. उर्वरित मार्गांवर बीआरटी सुरु केली जाईल. शहरात मेट्रोचे काम वेगात सुरु असून ते वेळेत पुर्ण करण्यात येईल.

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात डॉक्‍टरांची कायम कमतरता भासत असते. यावर आयुक्त हर्डीकर यांनी वायसीएम रुग्णालयात लवकरच पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम सुरु झाल्याने रुग्ण सेवेवरील ताण कमी होणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. पदव्युत्तर अभ्यासक्रमामुळे रुग्णालयातील डॉक्‍टरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची माहिती दिली.

शहराची लोकसंख्या आणि वाढती पाण्याची गरज लक्षात घेत, आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाच्या कामाला चालना देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरात 50 हजार घरे बांधण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे. रावेत, मोशी येथील गृहप्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचे काम देखील प्रत्यक्षात लवकरच सुरु होणार असल्याने नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध होणार आहे. बहुचर्चित “स्मार्ट सिटी’ची प्राथमिक कामे झाली आहेत. एच. ए. कंपनीची 59 एकर जागा सार्वजनिक सुविधांसाठी ताब्यात घेण्याचे नियोजन आहे. या प्रस्तावाला महासभेची मान्यता घेऊन राज्य सरकारकडे पाठविला आहे. सुधारित क्रीडा धोरण तयार केले आहे. टेनिस, बॅडमिंटन, कुस्ती, शुटिंग या खेळावर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. थेरगावात क्रीडा अकादमीचे काम उत्कृष्टपणे सुरु आहे. हॉकीपटू धनराज पिल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.

कचरा समस्या न सोडवल्याची खंत
घरातील कचरा उचलून डेपोपर्यंत नेऊन त्यावर योग्य प्रक्रिया करण्याचा हा प्रश्‍न मार्गी लागणे अपेक्षित होते. परंतु, हा प्रश्‍न मार्गी न लागल्याची खंत आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केली. शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असून फेरनिविदा काढणार असल्याने, हा प्रश्‍न सुटण्याचा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. “पार्किंग पॉलीसी’ तयार केली आहे. गटनेत्यांसमोर त्याचे सादरीकरण देखील झाले आहे. लवकरच त्याचे धोरण महासभेसमोर आणले जाईल. महासभेची मान्यता घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यासाठी नागरिकांना शेअर-ए-सायकल सारखे पर्याय उपलब्ध करुन दिले जाणार आहेत, अशी माहितीही आयुक्‍त हर्डीकर यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)