भाजपच्या सात बंडखोरांवर निलंबनाची कारवाई 

नगर – महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे तिकीट न मिळाल्यामुळे नाराज होऊन बंडखोरी केलेल्या सात उमेदवारांना भाजपने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. पक्षाचे शहर सरचिटणीस किशोर बोरा यांनी तसेच आदेश काढले आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे 267 इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली होती. पक्षाने निवडून येण्याची क्षमता तपासून उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यात मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेऊन उमेदवाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत पक्षाच्या विरोधात उमेदवारी केली आहे.

यात माजी शहराध्यक्ष मिलिंद गंधे (प्र. 4 ड ), आशा विधाते (16 ब), प्रतीक बारसे ( 15 ड ), विद्यमान नगरसेविका मनिषा बारस्कर (7 क ), गायत्री प्रशांत चोरडिया (16 अ). प्रितेश गुगळे (15 ड), माजी नगरसेवक शिवाजी लोंढे (17 ड) यांच्यावर पक्षाने कारवाई करत त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे.

पक्षाच्या उमेदवारांविरोधात उमेदवारी कायम ठेवून पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी प्रदेशच्या आदेशानुसार व शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्या मान्यतेने ही कारवाई करण्यात आल्याचे सरचिटणीस बोरा यांनी म्हटले आहे.
भाजपने कारवाई केल्यानंतर बंडखोरांनी पक्षाच्या नेत्यांवर टिका केली आहे.

या निवडणुकीत पक्षाच्या निष्ठावंतांना डावलून पक्षात नव्याने प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावरून पक्षात जुने व नव्याचा वाद सुरू झाला आहे. त्यात जुने पक्षाचे कार्यकर्ते अद्याप निवडणुकीत सक्रिय झालेले नाही. त्यांना सक्रिया करण्यासाठी पक्षाच्या पातळीवर प्रयत्न चालू आहेत. परंतु त्यांना अद्याप यश मिळाले नाही.

शिवाजी लोंढे हे भाजपचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ते माजी नगरसेवक आहेत. तरी देखील त्यांनी पक्षाशी बंडखोरी केली. ते केवळ बंडखोरीवर थांबले नाही तर त्यांनी तेथे कॉंग्रेसचे पुरस्कृत उमेदवार म्हणून गळ्यात कॉंग्रेसचा पंचा घातला होता. लोंढे यांच्या या कृतीमुळे पक्षाच्या शिस्तबद्ध प्रतिमेला तडा गेला. त्याची दखल पक्षश्रेष्ठींनी गंभीर घेतली आणि त्यांना पक्षातून निलंबित केले.

पालकमंत्री राम शिंदे यांना नाराज निष्ठावंतांबाबत विचारणा केली असता त्यांनी पक्षाचे काम करावे अन्यथा पक्ष त्यांना माफ करणार नाही, असा इशारा दिला होता. नेमके या इशाऱ्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पक्षाचे सरचिटणीस (संघटक) किशोर बोरा यांनी सात जणांना निलंबित केल्याचे पत्र प्रसिद्धीस दिले.

दरम्यान बंडखोरांनी झालेल्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्‍त करून खा. दिलीप गांधी व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर आरोप केले आहे. सध्या या बंडखोरांना पक्षाचे जुने कार्यकर्ते निवडणुकीत मदत करीत असल्याने पक्षाचा अधिकृत उमेदवार अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)