भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर राधामोहन सिंह ठेवणार देखरेख

हंसराज अहीर यांचाही समितीमध्ये समावेश

नवी दिल्ली -भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांवर देखरेख ठेवण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. त्या समितीचे नेतृत्व माजी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह करणार आहेत. सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजप संघटनात्मक निवडणुकांसाठी सज्ज झाला आहे. भाजपने सध्या देशव्यापी सदस्य नोंदणी मोहीम हाती घेतली आहे.

ती मोहीम संपल्यानंतर पुढील महिन्यात संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया सुरू होण्याची शक्‍यता आहे. ती प्रक्रिया पूर्ण होण्यास पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. त्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीची धुरा बिहारमधून खासदार असणाऱ्या राधामोहन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. समितीच्या सदस्यांमध्ये पक्षाचे महाराष्ट्रातील नेते आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांचाही समावेश आहे.

उत्तरप्रदेशातील खासदार विनोद सोनकर आणि कर्नाटकमधील आमदार सी.टी.रवी हे त्या समितीचे इतर दोन सदस्य आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्याने शहा भाजपचे अध्यक्षपद सोडतील, अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे पक्षाची धुरा नव्या नेत्याकडे सोपवली जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, भाजपने अजून त्याबाबत भूमिका जाहीर केलेली नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)