भाजपच्या विरोधात महाआघाडी स्थापण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नांना वेग 

चंद्राबाबूंनी घेतली मायावतींची भेट 

नवी दिल्ली, दि.27 -आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन.चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी देशाची राजधानी दिल्लीत बसपच्या प्रमुख मायावती यांची भेट घेतली. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी संघर्ष करण्यासाठी महाआघाडी स्थापण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नांना वेग आल्याचे मानले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चंद्राबाबू आणि मायावती यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. मात्र, त्याचा तपशील तातडीने समजू शकला नाही. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तिसगढ या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेसशी हातमिळवणी न करता बसपने वेगळी वाट चोखाळली. एवढेच नव्हे तर, भाजपशी दोन हात करण्याऐवजी कॉंग्रेस आम्हाला (बसप) संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप मायावती यांनी नुकताच केला. त्या घडामोडींमुळे विरोधकांची महाआघाडी स्थापण्याच्या हालचालींना धक्का बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

यापार्श्‍वभूमीवर, चंद्राबाबू आणि मायावती यांच्यातील भेटीचे महत्व वाढले आहे. चालू वर्षीच्या मार्चपर्यंत टीडीपी हा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा घटक होता. मात्र, आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्यास मोदी सरकारने नकार दर्शवल्याने संतप्त झालेला टीडीपी एनडीएमधून बाहेर पडला. त्यानंतर भाजपविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारलेल्या टीडीपीची कॉंग्रेसशी जवळीक वाढली आहे. त्यातून तेलंगण विधानसभा निवडणुकीसाठी टीडीपी आणि कॉंग्रेसने आघाडी केली आहे.

आता कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या महाआघाडीत सहभागी होण्यासाठी मायावती यांची मनधरणी करण्याच्या उद्देशातूनच चंद्राबाबूंनी त्यांची भेट घेतल्याचे मानले जात आहे. अर्थात, अलिकडेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचे अभिनेते आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी मायावती यांची भेट घेण्याचा इरादा व्यक्त केला होता. त्यामुळे कल्याण यांना मायावती यांच्यापासून दूर ठेवण्यासाठीच चंद्राबाबू त्यांच्यापर्यंत पोहचल्याचीही चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)