भाजपच्या राजवटीत फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो लावणेही देशद्रोह

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची सरकारवर घणाघाती टीका


आता फक्त टायर फुटले, निवडणुकीत नशीब फुटणार; शिवसेनाला टोला

कोल्हापूर – भाजप आणि शिवसेनेच्या राजवटीत घरात फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो लावणेही देशद्रोह ठरल्याचा ठपका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठेवला आहे. तसेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत त्यांना “मुहूर्त मंत्री’ अशी उपमा दिली आहे. तर आता फक्त टायर फुटले आहे, या निवडणुकीत नशीब फुटणार असल्याचा इशारा शिवसेनेला लगावला आहे.

कॉंग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. नक्षलवादाच्या नावाखाली विचारवंत आणि साहित्यिकांवर होत असलेल्या दडपशाहीच्या अनुषंगाने त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

हैद्राबाद येथील कवी वरवरा राव यांच्यावरील कारवाईचा संदर्भ देताना ते म्हणाले की, त्यांच्या मुलींच्या घराची झडती घेताना पुणे पोलिसांनी त्यांना हिंदू असताना घरी देवी-देवतांऐवजी फुले-आंबेडकरांच्या फोटो का लावता? असा संतापजनक सवाल केला. हे सरकार फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु, ही विचारधारा समाजात इतकी खोलवर रूजली आहे की, त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर येथील जनता भाजप व शिवसेनेचे हे सरकार समूळ उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही विरोधी पक्षनेत्यांनी दिला.

कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही विखे-पाटील यांनी खरमरीत टीका केली. ते राज्याचे केवळ महसूलमंत्री नसून “मुहूर्तमंत्री’ देखील आहेत. मंत्रीमंडळ विस्तार केव्हा होणार, शेतकरी कर्जमाफी केव्हा जाहीर होणार, मराठा आरक्षणासंदर्भात प्रक्रिया केव्हा होणार, भाजप-शिवसेनेची युती तुटणार की राहणार, असे सारे मुहूर्त तेच जाहीर करत असतात. आता जनता या सरकारला केव्हा घरी बसवणार, याचाही मुहूर्त चंद्रकांत पाटील यांनी जाहीर करून टाकावा, असा टोला विरोधी पक्षनेत्यांनी लगावला.

मुंबई-नाशिक प्रवासादरम्यान शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीचे टायर फुटल्याच्या घटनेवरून त्यांनी शिवसेनेवर निशाना साधला. आदित्य ठाकरेंच्या ड्रायव्हरने गाडीवर नियंत्रण मिळवले, ते बरे झाले. पण उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेवरील नियंत्रण सुटले आहे, त्याचे काय? आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा टायर फुटण्याची घटना म्हणजे शिवसेनेला नियतीने दिलेला एक इशारा आहे. आता फक्त गाडीचा टायर फुटला आहे. ते सत्तेतून तातडीने बाहेर पडले नाहीत तर पुढील निवडणुकीत त्यांचे नशीब फुटल्याशिवाय राहणार नाही, असे विखे-पाटील म्हणाले.

तो “महागुरू’ कोण?
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा संशयीत मारेकरी सचिन अंदुरे औरंगाबादेत कपड्याच्या दुकानात नोकरी करतो. दुसरा आरोपी शरद कळसकर कोल्हापुरात लेथमशीनवर काम करतो. डॉ. दाभोलकरांच्या विचारधारेशी तसूभरही संबंध नसताना हे आरोपी थंड डोक्‍याने त्यांची हत्या करतात. याचाच अर्थ त्यांची डोकी कोणी तरी भडकावली असून, तो “महागुरू’ कोण? असा प्रश्न विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला. यासंदर्भात सनातन संस्था व त्यांचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांची चौकशी का होत नाही? अशी विचारणाही त्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)