भाजपच्या काळात भेटवस्तुची परंपरा होणार खंडित

  • यंदा दिंड्यांना भेट वस्तू नाहीच

पिंपरी – आषाढीवारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे यंदा भेटवस्तू म्हणून “तंबू’ देण्याचे विचाराधीन होते. मात्र, बुधवारी (दि. 27) झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चाच न झाल्याने दिंड्यांना यंदा भेटवस्तू न देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षांपासून सुरु असलेली भेटवस्तू देण्याची परंपरा भाजपच्या काळात खंडित होणार आहे.

संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा या दोन्ही सोहळ्यांचे शहरातून मार्गक्रमण होते. यापैकी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्काम असतो. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांसाठी हा एक आनंदाचा क्षण असतो. या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शहरवासियांकडून दिंडीतील वारकऱ्यांची अन्नदान, पाणी वाटप, नाष्टा दिला जातो. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आषाढीवारीतील दिंडीप्रमुखांना दरवर्षी भेटवस्तू दिली जाते. गेली अनेक वर्षांपासून ही परंपरा पाळली जाते. याकरिता पंचवीस ते पन्नास लाख रुपये खर्च केले जातात. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून दिंड्यांना दिली जाणारी भेटवस्तू खरेदी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालयात झालेल्या पालखी नियोजनासंदर्भातील बैठकीत दिंड्यांना तंबू भेट देण्याचे सूतोवाच महापौर नितीन काळजे यांनी दिले होते; परंतु गेली दोन वर्षांपासून या भेटवस्तू खरेदीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने सत्ताधारी भाजने हा विषय फारसा अंगाला लावून घेतला नाही. विरोधी पक्षनेते व सर्व राजकीय पक्षांचे गटनेते यांचा समावेश असलेल्या समितीकडून भेटवस्तूची पडताळणी झाल्यानंतर ती खरेदी करण्याची भूमिका महापौर काळजे यांनी घेतली. तर या भेटवस्तू खरेदीमध्ये तांत्रिक अडचण असल्यास सर्व नगरसेवकांच्या एका महिन्याच्या मानधनातून ही भेटवस्तु खरेदी करण्याच तयारी स्थायी सदस्य विलास मडीगेरी यांनी दर्शविली होती. तसेच, यावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती.

मात्र, बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे ही सभा उरकती घेण्यात आली. त्यामुळे भेटवस्तू खरेदीवर चर्चाच न झाल्याने यंदा पालखी सोहळ्यात भेटवस्तु न देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

पालखी सोहळ्यातील दिंड्यांना भेटवस्तू दिली जाणार नसली, तरीदेखील या वारकऱ्यांना अधिकाधिक प्रमाणात नागरी सुविधा पुरविण्यावर भर दिला जाणार आहे. याचा वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना लाभ होणार आहे.
– एकनाथ पवार
सत्तारुढ पक्षनेते, पिंपरी-चिंचवड महापालिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)