भाजपचे ‘हौसले बुलंद’, नियोजन समिती निवडणुकीने कार्यकर्त्यांत उत्साह

अकोले तालुक्‍यातील चित्र : जालिंदर वाकचौरे, सुनीता भांगरे, सोनाली नाईकवाडी यांच्या निवडी

अकोले – अकोले तालुक्‍यात भाजपला सध्या चांगले दिवस आल्याने या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे संचारले आहे. जिल्हा नियोजन समितीवर पक्षाचे तीन शिलेदार निवडून गेल्याने आगामी विधानसभेच्या निवडणूक प्रक्रियेची व्यूहरचना सध्या सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीवर भाजपचे जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे व अकोले नगरपंचायतीच्या नगरसेविका सोनाली नाईकवाडी हे तिघेजण या निवडणुकीत मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.

भाजप हा पक्ष एकेकाळी “अस्पृश्‍य’ पक्ष समजला जात होता. मात्र, पक्षाच्या मूठभर कार्यकर्त्यांनी पक्षाचे एकेकाळचे चित्र बदलवले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाने तीन उमेदवार उभे केले होते. विशेष बाब म्हणजे हे उमेदवार मातब्बर असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने त्यांच्या उमेदवारीकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम या पक्षाने या तीनही जागा हस्तगत केल्या. निवडणुकीत विजयी झालेल्या सुनीता भांगरे या तिसऱ्यांदा जिल्हा परिषदेत गेल्या. तर, वैभव पिचड यांच्या राजूर गटाची जिल्हा परिषद रिक्‍त जागा जिंकणारे डॉ. किरण लहामटे हे दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत प्रवेश करते झाले. पक्षाचे जुने जाणते कार्यकर्ते व पक्षाचे प्रांतिकचे सदस्य जालिंदर वाकचौरे हे पहिल्यांदा जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून गेले. वाकचौरे हे अभ्यासू कार्यकर्ते आहेत. समाजात वावरणाऱ्या वाकचौरे यांचे सामाजिक “नेटवर्किंग’ही चांगले राहिले आहे. शिवाय, चळवळीचे अंग आणि सामाजिक प्रश्‍नांवर जेलची तयारी त्यांनी निळवंडे आंदोलनात निभावली. त्याचा परिणाम त्यांच्याकडे जिल्हा परिषदेचे गटनेतेपद चालून आले. ते फर्डे वक्‍ते तर आहेतच शिवाय माजी मंत्री एकनाथ खडसे व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विश्‍वासू गोटातील वाकचौरे हे त्यामुळेच चढत्या आलेखाने आता तालुका, जिल्हा व प्रांतिकची पदे हस्तगत करीत आहेत. त्यांनी जिल्हा नियोजन समितीवर यश मिळवून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला आश्‍चर्याचा धक्‍काच दिला आहे.

सुनीता भांगरे यांची राजकीय “इनिंग’ सुरूच आहे. त्यामुळे त्यांची जिल्हा नियोजन समितीवरील निवडणूक ही विशेष बाब राहिली नाही. मात्र, अकोले नगर पंचायतीच्या नगरसेविका सोनाली नाईकवाडी यांची निवड त्यामुळेच चर्चेत राहिली. त्या भाजपच्या ज्येष्ठ नेते शिवाजी धुमाळ यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. त्यामुळे त्यांच्या पराभवासाठी पडद्याआड हालचाली झाल्या. पण, त्या मोडीत काढण्याचे काम धुमाळ यांनी केले आणि सोनाली यांचा विजय सोपस्कार उरला. हा सर्व योगायोग नाही तर त्यामागे या पक्षाचे अध्यक्ष सीताराम भांगरे, सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, शिवाजी धुमाळ, वकील वसंतराव मनकर व अन्य सदस्यांची या मागे तपश्‍चर्या आहे. सध्या या विजयाने पक्षाचे सर्वच कार्यकर्ते सुखावले आहेत. आता या निवडणुकीने त्यांचे “हौसले बुलंद’ केले असून त्यांची विधानसभेच्या निवडणुकीची व्यूहरचना सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)