भाजपचे सरकार चार वर्षांत अपयशी ; नेते फक्‍त बोलण्यात माहीर- छगन भुजबळ

मुंबई: भाजपचे नेते फक्‍त बोलण्यात माहीर आहेत. बोलण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. सरकार बोलते खूप, पण करत काहीच नाही. नेते भाषण करतात, ऐकणारे माना डोलावतात, असा टोला लगावत भाजप सरकार गेल्या चार वर्षांत अपयशी ठरल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत केली.

विरोधी पक्षाच्यावतीने आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावावरील चर्चेची सुरूवात करताना भुजबळ यांनी आपल्या शैलीत सरकारवर हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीवेळी नाशिक जिल्ह्यातील जाहीर सभेत शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा आम्ही खातो असे सांगून शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला दर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या सरकारने शेतकऱ्यांचा पार वांदा केला, अशी तोफ त्यांनी डागली.

राज्याची आर्थिक स्थिती, वाढती बेरोजगारी, गुंतवणूक, सरकारच्या योजनांचा आणि घोषणांचा उडालेला बोजवारा, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आदी मुद्यांवरून भुजबळ यांनी सरकारवर तिखट टीका केली. सरकारचे प्रकल्प, योजना अपयशी ठरत असताना असे प्रकल्प करता तरी कशाला? असा सवालही त्यांनी केला.

राज्यात पोलिसांवर होत असलेल्या हल्ल्यांवरून भुजबळ यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यासाठी शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखाचे दाखले दिले. यावेळी सभागृहात भुजबळांच्या शेजारी उद्योग मंत्री सुभाष देसाई बसले होते. देसाई हे सामनाचे विश्वस्त आहेत. त्यामुळे आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका पण निदान यांच्यावर तरी विश्वास दाखवा, असा टोला भुजबळ यांनी भाजपला लगावला.

राज्याला कर्जबाजारी बनवले 

गेल्या चार वर्षात राज्याची पत घसरून राज्य दिवाळखोरीत केले आहे. कॉंग्रेस आघाडी सरकारने गेल्या 15 वर्षात 2 लाख कोटी रूपयांचे कर्ज काढले. तर भाजप सरकारने गेल्या चार वर्षात 2 लाख 69 कोटी रूपयांचे कर्ज लादल्याने राज्यावरील कर्जाचा बोजा 4 लाख 62 हजार कोटीवर गेला आहे. आघाडीने प्रत्येक वर्षी सरासरी 13 हजार 300 कोटीचे कर्ज काढले तर भाजपने वर्षाला 48 हजार कोटी रूपयांचे कर्ज काढून राज्याला कर्जबाजारी बनवले. पुरवणी मागण्या सादर करताना सरकारने आर्थिक शिस्त पाळली नाही. राज्याचा महसूल घटत असताना खर्च मात्र वाढत चालला आहे. प्रस्तावित समृध्दी प्रकल्पाला राज्यातील बॅंक कर्ज देण्यास तयार नसल्याने दक्षिण कोरियातील बॅंकांकडून कर्ज घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्याची ओळख कर्जबाजारी राज्य अशी झाल्याची टीका भुजबळ यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)