भाजपचे निलंबित खासदार किर्ती आझाद कॉंग्रेसच्या वाटेवर

राहुल गांधी यांच्यावर उधळली स्तुतिसुमने
पाटणा – भाजपचे निलंबित खासदार आणि माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. एवढेच नव्हे तर, कॉंग्रेसच्या तिकिटावर पुढील लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेतही त्यांनी दिले. त्यामुळे आझाद कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याचे चित्र पुढे आले आहे.

एका प्रादेशिक वृत्तवाहिनीशी बोलताना आझाद यांनी राहुल यांची स्तुती करतानाच केंद्रातील स्वपक्षाच्या (भाजप) सरकारवर निशाणा साधला. भाजप केंद्रात सत्तेवर येऊन चार वर्षांचा कालावधी लोटला. मागील निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या बहुतांश आश्‍वासनांची पूर्तता का झाली नाही, असा सवाल आता जनता विचारत आहे. असा सवाल करणे जनतेचा अधिकारच आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जनतेचा प्रतिनिधी या नात्याने त्यांच्या सुरात सूर मिसळणे हे माझे कर्तव्यच आहे, असे ते म्हणाले. सामान्य जनतेच्या आपुलकीचे मुद्दे राहुल अतिशय प्रभावीपणे मांडत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पुन्हा जोर धरत आहे. सत्तेत असणाऱ्यांसाठी ही बाब एकप्रकारे धोक्‍याची घंटाच आहे, असे परखड मतही त्यांनी मांडले.

दिल्ली क्रिकेट संघटनेतील कथित अनियमिततांवरून आझाद यांनी थेट भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना लक्ष्य केले. त्यामुळे आझाद यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. त्याचा संदर्भ देऊन त्यांनी माझ्या निलंबनाला तीन वर्षे होत येऊनही मला पक्ष नेतृत्वाशी बोलण्याची संधी दिली गेली नाही, अशी खंत व्यक्त केली.

पुढील राजकीय वाटचालीबाबत विचारल्यावर ते उत्तरले, पुढील निवडणूक मी लढवावी अशी माझ्या लोकसभा मतदारसंघातील (दरभंगा) जनतेची इच्छा आहे. त्यामुळे मी दरभंगातूनच राष्ट्रीय पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवेल. कुठला राजकीय पक्ष, असे विचारल्यावर त्यांनी देशात भाजप आणि कॉंग्रेस असे दोनच राष्ट्रीय पक्ष असल्याचे म्हटले.

आझाद यांचे वडील आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री दिवगंत भागवत झा आझाद कॉंग्रेसमध्ये सक्रिय होते. त्यांचा राजकीय वारसा चालवणारे आझाद तिसऱ्यांदा बिहारमधील दरभंगा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)