भाजपचे चाणक्‍य आणि चंद्रगुप्त कोण? 

हेमंत देसाई 

राज्यात भ्रष्टाचार शाश्‍वत आहे, त्याला पकडणे अवघड आहे, असेही चाणक्‍यनीतीत म्हटल्याचे अमितभाई सांगतात. ललित मोदी, नीरव मोदी, विजय मल्ल्या या बड्या धेंडांना केंद्र सरकारचे कसे संरक्षण आहे, हे लोकांनी बघितले आहे. त्याबद्दल बरीच ओरड झाल्यानंतर आणि याचा निवडणुकीत फटका बसू शकतो, याचा अंदाज आल्यामुळे केंद्र सरकारची आता धावपळ सुरू झाली आहे.

राजाला एकच पुत्र असेल; पण राज्य कारभारासाठी तो योग्य नसेल, तर राजा म्हणून त्याची निवड करू नये. जनतेतून आलेले नेतृत्व देशाचे भले करू शकते. ही एकप्रकारची चाणक्‍यनीती भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतीच पुण्यात उलगडून दाखवली. राजकारण्यांनी आपली जीवनशैली अत्यंत साधी ठेवावी. राजा हा राज्याचा प्रधानसेवक असतो, असे चाणक्‍याने सांगितले होते. तेव्हा चाणक्‍य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्पिरीट एकच वाटते, असा गुणगौरवही शहा यांनी केला. त्यावेळी मोदी हेच जर आधुनिक चाणक्‍य असतील, तर अमितभाईंचे वर्णन कोणत्या शब्दांत करावे, असा प्रश्‍न जमलेल्या लोकांना पडला. घराणेशाही देशाचे भले करू शकत नाही, असे सांगताना अमितभाईंचा राहुलद्वेष स्पष्टपणे दिसून येत होता.

भाजपच्या या चाणक्‍याच्या मते, परराष्ट्र धोरणात आपल्या राष्ट्राचे हित आणि दुसऱ्या राष्ट्राचा क्षय यावर भर असला पाहिजे, हे चाणक्‍यनीतीत सांगितले आहे. तसे जर असेल, तर मोदींनी पाकिस्तान या राष्ट्राचा कोणत्या प्रकारे क्षय केला आहे, ते त्यांनी सांगावे. आज अमेरिका आणि चीन भारताच्या डोक्‍यावर बसलेले आहेत आणि त्यांच्या दादागिरीपुढे आपले काही चालत नाही. साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर राजासाठी नव्हे, तर राष्ट्रासाठी केला पाहिजे. परंतु महाराष्ट्रात मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो आपल्या स्वतःसाठी व पक्षासाठी केला. जे काम करताना अंतरात्मा कचरेल, ते असत्य आणि प्रोत्साहन देईल, ते सत्य, असे चंद्रगुप्ताचा चाणक्‍य सांगतो. परंतु कोणतेही अपकृत्य करताना ज्यांचा अंतरात्मा कचरतच नाही; मग त्या दंगली असोत, फेक न्यूज असोत, विरोधकांचा छळ असो किंवा नोटाबंदीसारखे बेदरकार निर्णय असोत आणि गोरक्षकांना धुडगूस घालण्यासाठी प्रोत्साहन देणे असो अथवा कोणी काय खावे, प्यावे, नेसावे वा बघावे यावर बंधने घालणे असो; हे सगळे सत्यच आहे, असे म्हणून नागरिकांनी हतबल व्हावे का? राज्यात भ्रष्टाचार शाश्‍वत आहे, त्याला पकडणे अवघड आहे, असेही चाणक्‍यनीतीत म्हटल्याचे अमितभाई सांगतात.

ललित मोदी, नीरव मोदी, विजय मल्ल्या या बड्या धेंडांना केंद्र सरकारचे कसे संरक्षण आहे, हे लोकांनी बघितले आहे. त्याबद्दल बरीच ओरड झाल्यानंतर आणि याचा निवडणुकीत फटका बसू शकतो, याचा अंदाज आल्यामुळे केंद्र सरकारची आता धावपळ सुरू झाली आहे. महाराष्ट्रात तर कोयना प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमिनीचा घोटाळा गाजतो आहे. राज्यातील मंत्र्यांचा कथित भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. परंतु तरीही चाणक्‍यनीतीने प्रभावित झालेले मुख्यमंत्री त्यांना क्‍लीन चिट देऊन मोकळे झाले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे, लवकरच मोदी यांच्या निकटवर्तुळातील एका बड्या उद्योगपतीचा करोडो रुपयांचा जमीन घोटाळा उघडकीस येणार आहे.

सरकारविरोधात खोटी माहिती पसरवणारी वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे आणि वृत्तवाहिन्यांना समाजमाध्यमातून जोरदार पण योजनाबद्ध प्रत्युत्तर देण्याचे आवाहन पुण्यातच केले गेले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनाच भाजपच्या ट्रोल सेनेने अलीकडेच त्रास दिला होता. समाजमाध्यमातून द्वेष पसरवणाऱ्या ट्रोलांना प्रधानसेवकच फॉलो करत असतात. यापुढील निवडणूक ही समाजमाध्यमातूनच लढवली जाणार आहे, असा महान संदेश शहांनी दिला असला, तरी तो अगोदरपासूनच संघ-भाजपवाले अमलात आणत आहेत. बजरंग दल व विहिंपचे काही कार्यकर्ते बिहारमधील नवादा जिल्हा तुरुंगात स्थानबद्ध आहेत. जणू काही महान क्रांतिकारक तुरुंगात खितपत पडले आहेत, असे वाटून भाजपचे तेथील खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी त्यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी तर गोरक्षणाच्या नावाखाली एका व्यापाऱ्याची हत्या केल्या प्रकरणातील आठजणांचा जाहीर सत्कार केला.

वास्तविक वर्षभरापूर्वीच पंतप्रधानांनी तथाकथित गोरक्षकांवर हल्लाबोल केला होता; परंतु त्यानंतर काहीच दिवसांत झारखंडमधील रामगढमध्ये या आठजणांनी गोरक्षणाच्या नावाने एका व्यापाऱ्याला ठार मारले होते. त्यामुळे जयंतरावांचे पिताजी व माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा खवळले. आपल्या मुलाच्या कृत्याची लाज वाटते, अशा आशयाची भावना त्यांनी जाहीरपणे प्रकट केली. छत्तीसगडमधील आदिवासी पट्ट्यात धर्मांतराच्या मवद्द्यावरून भाजप पद्धतशीरपणे वातावरण तापवत आहे. पक्षाच्या संघटनेवर अमितभाईंची मजबूत पकड आहे. ते अहोरात्र काम करतात, हेसुद्धा कोणीही नाकारत नाही; परंतु पालखीत गेल्यामुळे हा माणूस पावन होतो का? भारतातील मुसलमानांत तसेच अन्य काही अल्पसंख्य समुदायांत अस्वस्थता निर्माण होत आहे, असे प्रतिपादन माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी बंगळुरू येथे केले होते. याचा थेट उल्लेख न करता, पंतप्रधानांनी सूचित केले की, हमीदभाईंनी राजनैतिक अधिकारी म्हणून मुस्लीम राष्ट्रांत काम केले आहे.

तसेच निवृत्तीनंतरच्या जीवनात अल्पसंख्य संलग्न विषयांवर लक्ष्य केंद्रित केले आहे आणि त्यामुळेच त्यांचे हे मत बनले आहे. संसदेत या प्रकारचे वक्‍तव्य करणे संकेताला धरून नसल्याचे हमीदभाईंनी म्हटले आहे. हे सगळे चाणक्‍यनीतीला धरून चालले आहे का? वास्तविक चाणक्‍य हा कुटिल सल्ले देणारा म्हणून प्रसिद्ध. अशा या कौटिल्याचे अर्थशास्त्रही प्रसिद्ध आहे. मात्र, मोदी सरकारचे अर्थशास्त्र नोटाबंदी, जीएसटीच्या वेळीच कोसळले होते. आणि या मंडळींना आता कुटिल नीती अवलंबूनही लोकसभा-विधानसभेच्या पोटनिवडणुकांत यश मिळत असल्याचे दिसत नाही. खरे तर या लोकांना सांगायला पाहिजे की, द्वारकाप्रसाद मिश्रा यांना कॉंग्रेसमधील चाणक्‍याची उपमा दिली जायची. ते मध्य प्रदेशचे दोनदा मुख्यमंत्री झाले होते. मिश्रा यांनी तीन हिंदी वृत्तपत्रांचे संपादन केले होते. कृष्णायन या त्यांच्या महाकाव्याची प्रशंसा झाली होती. ते आमदार झाले आणि कॅबिनेट मंत्री झाले. मिश्रा हे इंदिरा गांधींचे राजकीय सल्लागारही होते.

इंदिरा गांधी व मोरारजी देसाई यांच्यात सत्तावाटप करण्याचा फॉर्म्युला त्यांनीच शोधून काढला होता. त्यामुळे मोरारजी उपपंतप्रधान झाले. परंतु मध्ये उभयतांतील या समझोत्याचा भंग झाला आणि कॉंग्रेस फुटली. द्वारकाप्रसाद असोत की पी. एन. हक्‍सर; त्यांचा काळ केव्हाच संपला. आता अमित शहा आणि मोदी या चाणक्‍य व चंद्रगुप्तांचा जमाना सुरू झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)