भाजपचा मेळावा वादाच्या भोवऱ्यात

पिंपरी – निगडी-प्राधिकरणात येत्या 3 नोव्हेंबर रोजी होत असलेला भाजपचा मेळावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सभेच्या व्यासपीठासाठी करण्यात आलेल्या बेकायदा वृक्षतोडीवरुन नाराजी व्यक्त होत असतानाच आता मेळाव्याच्या तयारीसाठी ऐन दिवाळीच्या सुट्टीत मदनलाल धिंग्रा मैदान सात दिवस बंद ठेवले जाणार आहे. त्याला प्राधिकरणातील सामाजिक संघटनांनी एकत्र येत तीव्र विरोध केला आहे.

मदनलाल धिंग्रा मैदानावर तीन नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपचा मेळावा होणार आहे. येथून आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. त्यामुळे मेळाव्यासाठी भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे. मात्र, सभेसाठी व्यासपीठ तयार करताना तेथील काही झाडे तोडण्यात आली. याविरोधात वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर टीकेची झोड उठविली आहे. झाडे तोडण्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर फिरत आहेत. या अवैध वृक्षतोडीला निसर्ग मित्र, देवराई फाउंडेशन, अंघोळीची गोळी या संघटनांनी विरोध करत याविरोधात महापालिकेकडे दाद मागितली असल्याचे निसर्ग मित्रचे प्रशांत राऊळ यांनी कळविले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निगडी प्राधिकरणातील बॉर्न क्रेझी स्पोर्टस्‌ क्‍लब आणि संडे क्रिकेट क्‍लबनेही धिंग्रा मैदानावरील सभेला विरोध केला आहे. राजकीय पक्षांनी खेळाची मैदाने आपल्या सभांसाठी वापरू नयेत. ही मैदाने फक्त खेळांसाठी असावीत, असे या संघटनांचे म्हणणे आहे. बॉर्न क्रेझी स्पोर्टस्‌ क्‍लबचे संतोष मुळीक, नीलेश कोडितकर, अविनाश येवले, अभिजित पिसाळ, संडे क्रिकेट क्‍लबचे विनोद वेसनेकर, गौरव अरणकल्ले, प्रकाश मोरे यांनी धिंग्रा मैदानावरील या सभेला विरोध दर्शविला आहे, असे सुभाष राणे यांनी सांगितले.

सभेच्या तयारीसाठी हे मैदान 7 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सुट्टीत स्थानिक खेळाडूंची गैरसोय होणार आहे. जागरूक नागरिक संघटनेनेही खेळाचे मैदान राजकीय सभेसाठी वापरण्यास विरोध केलेला आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बेरी, उपाध्यक्ष मनोहर पद्मन, कार्यकारिणी सदस्य जगन्नाथ वैद्य, सुभाष राणे यांनी निषेधाचे पत्रकही प्रसिद्ध केले आहे.

महापालिकेच्या ठरावाला मूठमाती
कोणत्याही क्रीडांगणावर राजकीय अथवा सामाजिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येऊ नये असा ठराव पिंपरी-चिंचवड महापालिकेने केला आहे. त्यानुसार, यापूर्वी अनेक कार्यक्रम, राजकीय मेळावे, सभांना परवानगी नाकारण्यात आली. मात्र, भाजपला सभा घेण्याची परवानगी मिळालीच कशी, असा सवाल खेळाडू व वृक्षप्रेमी संघटनांनी उपस्थित केला आहे. सत्ताधारी भाजपच्या दबावाला बळी पडून महापालिका स्वतःच तयार केलेल्या ठरावाला मूठमाती देत असल्याचा आरोप होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)