भाजपचा बर्म्युडा

भागा वरखडे 

भाजप हा आता देशव्यापी पक्ष बनला आहे. इतर पक्षाचं उच्चाटन करण्याचा जणू विडाच भाजपनं उचलला आहे; परंतु तसं करताना इतरांचे काही गुण-अवगुणही भाजपला चिकटायला लागले आहेत. इतर पक्षीय नेते भाजपत येत असताना त्यांच्याबरोबर कार्यकर्तेही येत असतात. जुन्या-नव्यात चांगलं मनोमिलन होत नाही. भाजपवाढीसाठी अन्य पक्षांतून आलेल्यांचा उपयोग होत असला, तरी ज्यांनी भाजपवाढीसाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, त्यांना मात्र “अच्छे दिन’ येत नाहीत, सतरंज्या उचलण्याचं काम त्यांना करावंच लागतं. आयुष्यभर कष्ट करून ज्या पक्षाला चांगले दिवस आणले, त्याच पक्षाच्या भरभराटीच्या काळात मात्र आपल्याला डावललं जातं आहे, हे त्यांच्या मनातलं शल्य आहे. ते शल्य अधूनमधून खदखदीच्या रुपांत बाहेर येत असतं. जे चित्र देशात, राज्यात आहे, तेच नगरमध्येही आहे.

-Ads-

नगर लोकसभा मतदारसंघात तीनदा खासदार झालेल्या आणि एकदा मंत्रिपद मिळालेल्या खासदार दिलीप गांधी यांच्याकडूनही कळत न कळत का होईना भाजपतल्या गटबाजीला खतपाणी घातलं जात असल्यानं अन्य ठिकाणच्या गटबाजीला आळा घालण्याचं नैतिक बळ त्यांच्याकडंही नाही. नगरमध्ये भाजपनं एकाचवेळी दोन दोन शहराध्यक्ष, दोन दोन मंडलाध्यक्ष पाहिले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सत्कारासाठी पळविण्याचे प्रकार घडले. भाजप संस्कृतीत वाढलेल्या दोन गटांत कधीच जमलं नाही. त्यामुळं दानवे यांनी नगरच्या भाजपचं रुपांतर पायजम्यावरून बर्म्युड्यात झालं असल्याची टिप्पणी केली होती. लांब झालेला पायजमा दोन बोट कमी करण्याचं पत्नी, आई व भावजयीला सांगितल्यानंतर त्यांनी सुरुवातीला कामामुळं नकार दिला; परंतु परस्पर समन्वय नसल्यानं तिघींनीही पायजमा दोन-दोन बोट कमी करून त्याचं रुपांतर बर्म्युड्यात केल्याचा दानवे यांचा किस्सा चांगलाच गाजला होता. भाजपतही आता समन्वयाऐवजी बर्म्युडा करण्याची स्पर्धा लागली आहे.

नगर शहरातला भाजपचा वाद तर गेल्या दशकभरातही मिटविण्यात आला नाही. पक्षश्रेष्ठींनाच हा वाद चालू ठेवायचा आहे, की काय अशी शंका येते. अभय आगरकर व खा. गांधी यांच्या गटातला वाद इतका पराकोटीला गेला आहे, की परस्परांना संपविण्याची भाषा त्यातूनच होत आहे. खा. गांधी यांच्या गटानं शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही, तर खा. गांधी यांचं शिवसेना दररोज वस्त्रहरण करीत असताना आगरकर गट मात्र त्याची मजा लुटतो आहे. उलट, खा. गांधी यांचा पाणउतारा करणाऱ्या शिवसेनेसोबत सत्तेत या गटानं भागीदारी केली आहे.

मंडलाध्यक्षांच्या नियुक्‍त्या, नंतर त्या रद्द करणं, त्यातून परस्परांशी वस्त्रहरण करणं यामुळं भाजपची नाचक्की होत आहे. माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यानं शिवाजी महाराजांविषयी काढलेल्या अनुद्‌गारावरून भाजपचा राज्यभरात निषेध करण्यात आला. छिंदमच्या घरावर, कार्यालयावर हल्ला झाला. त्यानंतर छिंदमचा उपमहापौरपदाचा राजीनामा घेण्यात आला. ज्या शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळं भाजपला बचावाची भूमिका घ्यावी लागली, त्याच शिवसेनेसोबत भाजपचा आगरकर गट सत्तेत सहभागी झाला. आता छिंदम यानं महापौरांवरच खोट्या लेटरपॅडचा वापर करून राजीनामा तयार केल्याचा आरोप केला आहे. छिंदम प्रकरणातून भाजपच्या पाकळ्यांमधला विसंवाद पुढं आला आहे.

नगर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत. त्यापैकी चार आमदार दक्षिण लोकसभा मतदारसंघातील आहेत. या चारही आमदारांच्या मतदारसंघात भाजपमध्येच अंतर्गत धुसफूस मोठी आहे. शिवाजीराव कर्डिले हा स्वतंत्र पक्ष असून वारा फिरेल, तशी त्यांची दिशा फिरते. खरेतर ते विखे गटाचे. त्यांना राहुरी तालुक्‍यात विखे यांची मदत लागते. राहुरीत चंद्रशेखर कदम हे भाजपचे निष्ठावान आहेत. ते पक्षावर कधीही नाराजी दाखविणार नाहीत. नेवाशात बाळासाहेब मुरकुटे हे आमदार असून त्यांनाही विखे गटाचीच मदत आहे. मुरकुटे कॉंग्रेस संस्कृतीत वाढलेले. भाजपसाठी खस्ता खाल्लेल्यांना मुरकुटे कधीच विश्‍वासात घेत नाहीत. वर्षानुवर्षे पक्षवाढीसाठी झटलेल्यांना आता अडगळीत पडावे लागले आहे. पारनेरमध्ये या पेक्षा वेगळी परिस्थिती नाही. इथं तर खा. गांधी व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या दोन गटांतच संघर्ष आहे. राष्ट्रवादीतून आमदार होण्याची संधी नाही, त्यामुळे विश्‍वनाथ कोरडे भाजपत आले. ते प्रा. शिंदे यांच्या गटाचे आहेत. खा. गांधी यांना मानणारा जुना निष्ठावंताचा गट कार्यरत आहे. खा. गांधी तालुक्‍यात आले, की हा गट कार्यक्रमाला हजेरी लावतो. एरव्ही कोरडे यांच्याबरोबर तो नसतो. कोरडेही भाजपच्या खा. गांधी गटाला विश्‍वासात घेत नाहीत. जामखेड-कर्जत हा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा मतदारसंघ. त्या मतदारसंघात गटबाजी नसेल, असं वाटणं स्वाभावीक आहे; परंतु प्रत्यक्षात तसं नाही. कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांना आमदार होण्याचं स्वप्न कायम खुणावत असतं. जामखेडच्या डॉ. भगवानराव मुरुमकर यांची अवस्था त्यापेक्षा वेगळी नाही. डॉ. मुरुमकर फार महत्त्वाकांक्षी नाहीत; परंतु राऊत मात्र फार महत्त्वाकांक्षी आहेत. त्यांनी महासंग्राम युवामंचच्या माध्यमातून संघटन वाढविलं आहे. शिवसेनेच्या एका गटाला त्यांनी हाताशी धरलं आहे.

श्रीगोंदे तालुक्‍यात तर बबनराव पाचपुते यांनी भाजप हायजॅक केला आहे. तिथं खा. गांधी यांचा स्वतंत्र गट आहे. हा गट खा. गांधी श्रीगोंदे तालुक्‍यात आले, तर हजर असतो. खा. गांधी यांना पाचपुते यांच्या मदतीची गरज असल्यानं ते पाचपुते यांना फार विरोध करू शकत नाहीत. राजेंद्र म्हस्के, दत्तात्रय हिरणावळे, संतोष लगड, सुवर्णा पाचपुते यांनी भाजप वाढविण्यासाठी प्रयत्न केले. सुवर्णा पाचपुते यांना तर आमदारकीचे वेध लागलेले; परंतु बबनरावांच्या गावात राहून त्यांच्याच विरोधात राजकारण करणं फार शहाणपणाचं नाही, हे त्यांना पटलं आहे. बबनराव यांनी भाजपकडून निवडणूक लढविली.त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. प्रा. शिंदे यांना राष्ट्रवादीचे राहुल जगताप यांना भाजपत आणायचं आहे. त्यांचे त्यासाठी प्रयत्न आहेत. त्यामुळं बबनरावही सावध आहेत. त्यांचा गट एकसंघ आहे. अधिक उमेदवार रिंगणात असले, तर ते त्यांच्या पथ्थ्यावर पडणारं आहे. त्यामुळं ते अपक्ष म्हणून उभे राहतील. भाजपचेच लोक एकमेकांचे पाय ओढताहेत. भाजपच्या पाकळ्या परस्परांशी संवादाऐवजी विसंवादच करीत आहेत.

आमदार मोनिका राजळे यांनी पाथर्डी-शेवगावमध्ये चांगलाच जम बसविला आहे. लोकांच्या सुखदुःखात त्या सहभागी होतात. आमदारकीची उमेदवारी त्यांना मिळणार, यात आता कोणतीही शंका नाही. त्यांना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांचं पाठबळ आहे. पती निधनाचं दुःख बाजूला सावरून मोनिका यांनी तालुक्‍यात चांगलं संघटन केलं आहे. असं असताना खा. गांधी यांनी आपल्याच पक्षाच्या आमदाराविरोधात भूमिका घ्यायला नको; परंतु भाजपच्या नाराज गटानं बोलविलेल्या मेळाव्याला खा. गांधी यांनी आवर्जून हजेरी लावली. भारतीय जनता युवा मोर्चाचे अमोल पालवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बोलविलेल्या बैठकीत आ. राजळे यांच्याविरोधात सूर लावला. अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करीत विधानसभेच्या जागेवर हक्क सांगितला. महत्त्वाकांक्षी असणं वेगळं आणि त्यासाठी प्रयत्न करणं वेगळं; परंतु आपल्याच पक्षाच्या आमदारांविरोधात भाष्य करणं आणि त्या व्यासपीठावर त्याच पक्षाच्या खासदारानं उपस्थित राहणं हे पक्षशिस्तीत बसत नाही. आमदारांच्या विरोधात भाषणं करणाऱ्यांना खासदारांनी रोखायला हवं होतं; परंतु गटबाजीला त्यांचीही मूकसंमती आहे, की काय अशी शंका यावी, अशी स्थिती आहे.

शेवगावमधील चंद्रशेखर घुले व नरेंद्र घुले या घुले बंधूचं वर्चस्व मोडीत काढण्यात राजळे यांना यश आलं. ग्रामीण भागात फारशी गटबाजी नसली, तरी शेवगाव शहरात भाजपच्या तीन नेत्यांचं परस्परांचं जमत नाही. अरुण मुंढे, अशोक आहुजा व कमलेश गांधी यांचं तिघांत समन्वय नव्हता. काहींनी आतापर्यंत पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेतले. आता मात्र त्यांना राजळे यांनी एकत्र आणलं आहे. भाजपच्या ठिकठिकाणच्या नेत्यांना नांदा सौख्य भरे असं म्हणण्याशिवाय आपल्या हाती तरी काय आहे?

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)