भांबवलीकरांना हवा शासनाच्या मदतीचा हात

107 वर्षांपूर्वी केलेल्या पाणीक्रांतीची आठवण:पण पाटाची दुर्दशा
सातारा, दि. 13 प्रतिनिधी –
स्वातंत्रपूर्व काळात ब्रिटिश सरकारने अन्यायाने कुणबी जमिनीच्या नावाखाली खालसा केलेल्या हजारो एकर जमीनी वनखात्याकडे वर्ग करून कोंडी केलेली परळी खोऱ्यातील भांबवली या अतिदुर्गम भागातील गावाने ब्रिटिशांच्या मनमानीला एकजुटीने उत्तर देत पंचक्रोशीतील 16 गावांच्या पाठींब्याने कास ते भांबवली या पाच किलोमीटर अंतरावरील डोंगर फोडून बांधलेला पाण्याचा पाट आणि उरमोडी नदीवर बंधारा बांधून तब्बल 107 वर्षांपूर्वी केलेली पाणीक्रांती हा समस्त भांबवलीकरांच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. मात्र, आज या पाटाची दुरवस्था झाली आहे. शासनाने मदतीचा हात दिल्यास भांबवलीकर आजही त्याची पुनरावृत्ती करण्यास तयार आहेत.
साताऱ्यापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेले भांबवली हे गाव आजही दुर्गम समजले जाते शंभर वर्षांपूर्वी अवघ्या 15 हुंबरटा असलेल्या या गावातील प्रत्येकाकडे मुबलक जमीन होती. गावकऱ्यांनी दऱ्या कपारीत असलेल्या झऱ्याच्या पाण्याला बंधारे घालत आपली जमीन चांगलीच पिकाऊ केली आहे. त्यामुळे शेतीचे उत्पन्नही मोठे येत होते. व त्याप्रमाणात शेतसाराही भरावा लागत असे मात्र, हा शेतसारा भरण्यासाठी त्याकाळी परळी येथे यावे लागत होते. शेतसारा जास्त असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत होते. डोक्‍यावरून धान्याची पोती वाहून नेने जिकिरीचे असल्याने त्यांनी ब्रिटीश शासनाला शेतसारा गावात येऊन घ्यावा अशी विनंतीही केली पण त्यांनी उलट 1900 साली शेतसारा आणखीन वाढविला यावर उपाय म्हणून ग्रामस्थांनाच तुम्ही पोटापुरत्या जमिनी तुमच्याकडे ठेवा बाकी सरकारकडे जमा करा असा सल्ला दिला. प्रारंभी शेतसाऱ्याचा त्रास कमी होणार या आनंदाने अनेकांनी आपल्याकडील जमिनी सरकारला वर्ग केल्या. मात्र,ब्रिटीश सरकारने कुटणीतीने या जमिनी आपल्याच अखत्यारीत असलेल्या वनखात्याकडे परस्पर वर्ग केल्या. यापासून अनभिज्ञ असलेल्या भांबवलीकराना जाग आली त्यावेळी त्यांच्याच जमिनीत असलेले पाण्याचे स्त्रोत त्यांना वापरण्यासाठी बंदी घालण्यात आली होती.
यावर भांबवली गावचे प्रमुख असलेले रावजी भागोजी मोरे यांनी ब्रिटिश सरकारकडे 7 मे 1909 रोजी नुकत्याच 1885 साली बांधलेल्या कास तलावाचा पाण्याचा स्रोत असलेल्या उरमोडी नदीवर बंधारा बांधण्यासाठी आणि तेथून भांबवलीपर्यंत पाटाने पाणी आणण्यासाठी तत्कालीन मामलेदार यांच्याकडे अर्ज केला. एव्हढेच करून ते थांबले नाहीत तर त्यांनी पंचक्रोशीतील आलवडी, धावली, पाटेघर, वेनेखोल,केळवली, जळकेवाडी, रोहोट, कास, अंधारी, जंगटी, उंबरी, कासानी, आटाळी, बामणोली, कारगाव, मोरघळ या गावातील प्रमुखांची भेट घेऊन आपली पाण्याची अडचण सांगितली. लगेचच पुढचा मागचा विचार न करता सर्वांनी मदत करण्याची तयारी दाखविली. दरम्यान दोन वर्ष सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले त्यांनी 7 मे 1911 रोजी भांबवलीकराना उरमोडीवर बंधारा बांधण्यासाठी आणि कास ते भांबवली पाट बांधण्यास परवानगी दिली.
7 मे 1911 रोजी परवानगी मिळाल्यानंतर रावजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली 16 गावातील लोकांनी एका वर्षात उरमोडी नदीवरील बंधारा आणि भांबवली ते कास या पाच किलोमीटर अंतरावरील पाट श्रमदानातून बांधला. यावेळी येणाऱ्या ग्रामस्थांना एक वेळचे जेवण देण्यात आले. कारगावचे मुसळे हे या कामासाठी दररोज घोड्यावरून येत असत अशी आठवण ग्रामस्थांनी सांगितली. अखेर 1912 मध्ये हा पाट बांधून पूर्ण करण्यात आला गाव पुन्हा सुजलाम सुफलाम झाला. सद्या सुरू असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या आधी तब्बल 107 वर्षांपूर्वी भांबवली सारख्या दुर्गम भागातील गावाने दाखवलेली एकजूट आणि त्यांना पंचक्रोशीने दिलेली साथ निश्‍चितच दिशादर्शक आहे.
चौकट:
प्रत्येकवर्षी श्रमदानातून या पाटाची दुरुस्ती आणि साफसफाई करण्यात येत आहे. मात्र, सद्या गावातील तरुण कामाच्या निमित्ताने शहराकडे वळल्याने या पाटाची दुरुस्ती झालेली नाही. तरी हा पाट आपले काम आजही त्याच निष्टेन करीत आहे. तरी शासनाने याच मार्गावरून गावाला पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)