भांडणे सोडवायला गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की

वारुळवाडीतील प्रकार ः सहा जणांवर गुन्हा दाखल

नारायणगाव -वारुळवाडी येथे घरगुती कारणावरून दोन कुटुंबांमध्ये मोठ्या स्वरुपात लाठी, काठ्या, लोखंडी गज घेऊन तुंबळ हाणामारी सुरू असताना नारायणगाव पोलीस तात्काळ पोहचल्याने मोठी घटना टळली; परंतु भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचारी व महिला कर्मचारी यांना धक्काबुक्की व अरेरावी करणाऱ्या नागापूर (ता. आंबेगाव) येथील 6 जणांवर सरकारी कामात अडथळा केल्याने शनिवारी (दि. 1) गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अर्जुन घोडे यांनी दिली.
गौरी पराग वामन, गोंविद शंकर भोर, संगिता गोंविद भोर, अक्षय गोंविद भोर, अनंता वाघ, गौरी हिचा चुलत भाऊ (नाव पत्ता माहित नाही) (सर्व रा. नागापूर, ता. आंबेगाव) यांच्यावर भादंवि कलम 353, 332, 504, 506 व मुंबई पोलीस कायदा 110, 112, 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद महिला पोलीस नाईक प्रियांका भीमा लोंढे यांनी दिली आहे. तसेच सुजाता जगदीश वामन यांचे फिर्यादी वरून गौरी वामन, गोंविद भोर, संगिता भोर, अक्षय गोंविद भोर, अनंता वाघ, गौरी हिचा चुलत भाऊ आदीं विरुद्ध 354, 452, 323, 143, 147, 149, 504, 506, 427 कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पराग जगदीश वामन (रा. कुबेर व्हिला, वारूळवाडी, ता. जुन्नर) व त्यांची पत्नी गौरी वामन यांच्यामध्ये सात ते आठ महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू आहे. त्यामुळे गौरी वामन ही आठ महिन्यांच्या मुलीसह माहेरीच असते. शनिवारी पोलीस ठाण्यात दूरध्वनी आला की, “”वारुळवाडी येथील कुबेर व्हिला या इमारतीमध्ये पाच ते सहाजण त्यामध्ये काही महिला व पुरुष हे काठ्या, लोखंडी गज, दांडके घेऊन एका घराचे काचा फोडून व नुकसान करीत आहेत. मोठ्या आवाजात शिवीगाळ करीत आहेत. तसेच घरामधील लोक हे घरामध्ये अडकून पडले असून तुम्ही ताबडतोब या” असे सांगितले. पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक प्रियांका लोंढे, कॉन्टेबल धनंजय पालवे, शैलेश वाघमारे, स्वप्निल लोहार हे त्या ठिकाणी गेले असता काही महिला व लोक हे हातात काठ्या, गज घेऊन मोठमोठ्याने “यांना मारुन टाका, यांचे हात पाय मोडा’ असे म्हणत होते. म्हणून पोलीस कर्मचारी यांनी “तुम्ही भांडणे करू नका, पोलीस ठाण्यात चला’, असे म्हणाले असता ते “पोलिसांना सुद्धा मारा’, असे म्हणून पोलिसांवर सुद्धा हात उगारु लागले. म्हणून त्यांनी पालवे यांनी फोन करून आणखी पोलीस व महिला पोलीस कर्मचारी यांना बोलावून घेतले. त्यावेळी पोलीस नाईक आर. व्ही. शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष दुपारगुडे, महिला पोलीस नाईक लोंढे, महिला कर्मचारी दरवडे असे गेले व ते सुद्धा त्या लोकांना समजून सांगत असताना त्यातील काही लोकांनी “पोलिसांवर सुद्धा हात उचला’ व त्यातील एका महिलेने महिला पोलीस कर्मचारी पोलीस नाईक लोंढे यांची कॉलर पकडून हाताने बुक्‍क्‍याने मारहाण करण्यास सुरुवात केली. इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडून महिला पोलीस कर्मचारी लोंढे यांची सुटका केली व त्या सर्व लोकांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्यात आणल्यावर सुद्धा त्यांनी धिंगाणा, आरडा ओरडा करून पोलिसांना शिवीगाळ केली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राहुल गोंधे हे करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)