भव्यदिव्यतेपेक्षा गरज पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची

– अंजली खमितकर

पुणे – मोठमोठे सजावटीचे महाल, रस्त्यांमध्येच उभारलेल्या विविध ठिकाणच्या मंदिरांच्या भव्यदिव्य प्रतिकृती, त्यात गुंतलेले कोट्यवधी रुपयांचे अर्थकारण या सगळ्या भव्यदिव्यतेपलिकडे जाऊन आता गरज निर्माण झाली आहे, ती पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची.

काही दशकांपूर्वी गणेशमूर्तींचा आकार ठराविक होता. मात्र, उत्सव हा जंगी साजरा केला जायचा. त्यामध्ये भव्यदिव्यता नव्हती, मात्र लोकसहभाग खूप मोठा होता. नाटके, गाण्यांचे कार्यक्रम, मेळे अशा माध्यमातून लोकरंजन करत गणेशोत्सव साजरा केला जात होता. त्या नाटक आणि अन्य मनोरंजन कार्यक्रमातून कलाकार घडत असे, त्याच्या कलेची वाखण्णी होत असे. त्यातूनच एखादा छोटा कलाकार मोठ्या पडद्यावर चमकत असे. या गोष्टी हळूहळू मागे पडत जाऊन मोठ्या मूर्ती, भव्यदिव्य देखावे, विविध पौराणिक विषयांवरील देखावे, हलते देखावे अशा एक ना अनेक गोष्टी गणेशोत्सवात येऊ लागल्या. यातून कला सादर करणारी मंडळी मागे पडू लागली आणि भव्य दिव्य वास्तू उभारणाऱ्या मजुरांची मागणी वाढली. त्यांच्या हाताला रोजगार मिळाला असला, तरी कोठेतरी उत्सवातील उत्साह, जिवंतपणा हरवला आहे की काय, अशी स्थिती आज निर्माण झाली आहे. त्यामुळेच भव्यदिव्यतेपेक्षा आता जास्त संवेदनशील, जिवंत आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे.

पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट याकडे नागरिकांनी लक्ष द्यायला सुरूवात केली आहे. मात्र त्याचे प्रमाण आजही नगण्य आहे. प्लॅस्टिकचा वापर टाळा याची हाक यावर्षीपासून सरकारने दिली आहे. ही बाब स्वत:हून पुढाकार घेण्याची आहे. त्यातूनच निर्माण होणारा निर्माल्य आणि कचऱ्याचा प्रश्‍न त्याचे निर्मूलन होणेही महत्त्वाचे आहे.

गणेशोत्सवाच्या उत्साहावर वाहतूक कोंडी आणि ध्वनी आणि हवेचे प्रदूषणामुळे काजळी निर्माण होऊ लागली आहे. गणेशोत्सव म्हटल्यानंतर वाहतूक कोंडी, डीजेचे आवाज आणि कोंडीत अडकलेल्या वाहनांचा धूर यामुळे सर्वसामान्यांना आता तो नकोसा वाटू लागला आहे. या मुळेच अनेक पर्यावरणवाद्यांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्याची परिणती ही उत्सवाला धरबंद घालणारी झाली आहे. अनेक नियम याचमुळे न्यायालयाने घातले आहेत.

या गोष्टींचे भान वेळीच आले असते, तर न्यायालयापर्यंत ही बाब गेली नसती आणि न्यायालयाला धार्मिक उत्सवाच्या विषयात हस्तक्षेप करण्याची गरज निर्माण झाली नसती. आतातरी या गोष्टी टाळण्याची गरज तीव्रतेने निर्माण झाली आहे. याला वेळीच धरबंध घातला नाही, तर याचा परिणाम थेट माणसाच्या आरोग्यावर आणि पर्यायाने पुढील पिढीवर होणार आहे. या परिणामांची तीव्रता ही पुढील पिढीने उत्सवच नको अशी म्हणणारी ठरू नये, एवढीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना !


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)