भविष्यात रुंदीकरण रखडणार; राष्ट्रवादीचा भाजपवर आरोप

कात्रज-कोंढवा रस्ता : भूमिपूजनचा कार्यक्रम चुकीचा

पुणे – कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले असले तरी या रस्त्यासाठी केवळ 40 टक्‍केच जागा ताब्यात घेण्यात आली असल्याने भविष्यात हे रुंदीकरण रखडणार असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपने चुकीच्या पद्धतीने हा उद्‌घाटनाचा कार्यक्रम उरकला असल्याचे स्पष्ट केले. यावेळी या परिसरातील नगरसेवक प्रकाश कदम, माजी महापौर दत्ता धनकवडे उपस्थित होते.

या रस्त्याचे काम करावे यासाठी ऑगस्ट 2012 मध्ये स्थानिक नगरसेविका भारती कदम यांनी पालिकेला पत्र दिले होते. त्यानंतर आतापर्यंत सतत पाठपुरावा त्यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या सूचनेनंतर स्थायी समितीच्या अध्यक्षा असताना आश्‍विनी कदम यांनी 15 कोटींचा निधी मंजूर केला होता. राष्ट्रवादीने यासाठी निधी उपलब्ध करून देत प्रक्रिया राबविली होती. पालिकेत सत्ताधारी असणाऱ्या भाजपने हा कार्यक्रम घाईघाईने उरकला आहे. प्रत्यक्षात या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते व मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या उपस्थितीत करण्याचा ठराव पालिकेच्या सर्वसाधारणसभेत मान्य करण्यात आला होता. मात्र, त्याकडे भाजपने दुर्लेक्ष करून हा भूमिपूजनाचा कार्यक्रम राबविला, असेही तुपे यांनी सांगितले.

तुपे म्हणाले, या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी राष्ट्रवादीने पुढाकार घेतला आहे. त्यानंतर आता अचानक भाजपला जाग आली असून त्यांच्याकडून उद्‌घाटन केले. या रस्त्यावर दोन तरुणींचा जीव गेल्यानंतर 2012 पासून आपण स्वत: रस्ता रुंदीकरणासाठी वेळोवेळी प्रयत्न केले, असे नगरसेवक प्रकाश कदम यांनी सांगितले. सत्ताधारी भाजपकडून चुकीच्या पद्धतीने हे काम केले असल्याची टीका माजी महापौर धनकवडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)