भविष्यातील विद्यार्थी

जगातील उत्कृष्ट शिक्षक आपल्याला लाभावा हे प्रत्येक हुशार विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. परंतु दुर्दैवाने ते प्रत्येकाच्या नशिबी असू शकत नाही. कारण याला नैसर्गिक मर्यादा आहेतच. एक शिक्षक एका वेळेस किती ठिकाणी काम करणार? किती वेळ करणार? किती दिवस करणार? जगातल्या प्रत्येक बुद्धिमान व्यक्तीला मृत्यूला सामोरे जावे लागतेच आणि तेथेच त्या बुद्धीचाही शेवट असतो. स्वतःचे बेस्ट स्वतःसोबतच घेवून त्या बुद्धिमान व्यक्तीला जावे लागते परंतु उपलब्ध तंत्रज्ञान व येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या जोरावर यातून सुटण्याचा मार्ग दिसत आहे. व्यक्‍ती वयानुसार क्षीण होत जाऊन संपते परंतु तंत्रज्ञान वयानुसार प्रगत होत जाते. एका उत्कृष्ट तंत्रज्ञान किंवा रोबोटचे लाखो करोडो रोबोट तयार करून ते विद्यार्थ्यांसमोर ठेवणे शक्‍य आहे परंतु मानवी शरीराला या मर्यादा आहेत. संपूर्ण जग मिळूनही उत्कृष्ट बुद्धिमान शरीराचे पुनरुत्पादन करु शकत नाही.

प्राचीन शिक्षण पद्धती गुरुकुल प्रणालीवर म्हणजेच शिक्षक केंद्रित होती. शैक्षणिक संक्रमणाच्या काळात आज शिक्षण पद्धती विद्यार्थीकेंद्रित बनलेली आहे परंतु भविष्यात ही पद्धती तंत्रज्ञान केंद्रित होईल याची बीजे रोवली जात आहेत. एका उत्कृष्ट शिक्षकाच्या शारीरिक व नैसर्गिक मर्यादेवर मात करून आज सोफिया, बिना 48, फिलीप यासारखे यंत्रमानव व यंत्र युवती वेगवेगळ्या ठिकाणी उद्‌बोधन वर्ग व चर्चासत्र घडवून आणत आहेत. चीन ने तर 24 तास सेवा पुरवणारा न्यूज अँकर वर्षाच्या शेवटाला निर्माण करून या क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. हजारो किलोमीटर वरून रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून आज डॉक्‍टर पेशंटचे वेगवेगळे आजारांचे निदान व उपचार करू शकतात. 10 एमबीपीएस वेग असलेल्या वायफायची जागा आज 100 ते 240 जीबीपीएस म्हणजे 24000 पट वेग असलेले लायफाय घेत आहे. भारत सरकारनेही ए आय फॉर ऑल या उपक्रमाचा स्वीकार करून शिक्षण व आरोग्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यासाठी नियोजन केले आहे. नॅशनल डिजिटल लायब्ररी हे याचे उत्तम उदाहरण आहे. लाखो पुस्तके एका क्‍लिकवर विनामूल्य उपलब्ध होणे ही शिक्षण क्षेत्रातील प्रचंड मोठी उपलब्धी आहे. भारतीय तंत्रज्ञानाचा गौरव असलेले आय आय टी कॉलेज यांनीही आपल्या प्राध्यापकांचे शेकडो व्हिडिओ लेक्‍चर यु ट्यूब द्वारे विद्यार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत. अशा प्रकारे पीडीएफ बुक, ऑडिओ बुक्‍स, व्हीडिओ लेक्‍चर, ऑनलाइन टेस्ट या सर्व पद्धतींचा शिक्षणात वापर करून शिक्षण पद्धती अधिक अधिक समृद्ध होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अगदी ग्रामीण भागातील विचार केला तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव येथील दत्तात्रय सखाराम शिंदे यांनी तयार केलेला डिजिटल ग्लास बोर्ड फक्त शंभर रुपयात 80 हजार रुपयांच्या स्मार्ट बोर्ड ची सेवा देतो. सहाशे रुपयांचा गुगलराव पाटील रोबोट टीचर 5000 रुपयांच्या अलेक्‍सा किंवा गूगल होमची सेवा त्यापेक्षाही चांगली देतो. एक रुपयाही खर्च न करता त्या व्यवस्थेचा वापर करून तयार केलेला आन्सरिंग बोर्ड म्हणजेच उत्तरे देणारा फळा विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची लेखी व तोंडी उत्तरेही देतो. शिवाय अहमदनगर जिल्ह्यामध्ये तंत्रस्नेही शिक्षकांनी सुरू केलेली ग्लोबल नगरी ही चळवळ जिल्ह्यातील विद्यार्थी व शिक्षकांना जागतिक स्तरावर व्यासपीठ मिळवून देत आहे.

भारतीय शिक्षण व्यवस्था जगाच्या वीस वर्षे मागे आहे हा डाग पुसायचा असेल आणि मिसाईल मॅन, महान शास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्‍टर एपीजे अब्दुल कलाम यांचे समृद्ध भारताचे स्वप्न साकार करायचे असेल तर भारताला, भारतातील शिक्षण व्यवस्थेला तंत्रज्ञानाचा योग्य स्वीकार करून स्वतःला सिद्ध करत राहावेच लागेल.

– दत्तात्रय सखाराम शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)