डीएसकेंच्या मालमत्तेची विक्री होणार

– 143 मालमत्तांची यादी न्यायालयात सादर
– विक्रीतून 400 ते 500 कोटी मिळण्याचा अंदाज
– सोमवारी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे लक्ष

पुणे – बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी ऊर्फ डीसके यांच्या एकुण 412 मालमत्ता आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यापैकी कोणताही बोजा नसलेल्या विक्रीयोग्य 143 मालमत्तांची यादी विशेष सकारी वकील प्रवीण चव्हाण विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांच्या न्यायालयात शुक्रवारी सादर केल्या. या मालमत्तांच्या विक्रीतून 400 ते 500 कोटी रुपये मिळतील, असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. आलेल्या पैशांतून गुंतवणुकदारांना काही प्रमाणात पैसे परत देण्यात येणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याविषयी ऍड. चव्हाण म्हणाले, “डीएसके यांना अटक केल्यानंतर त्यांच्या विविध ठिकाणांवरील मालमत्ता जप्त करण्याची कारवाई पोलिसांनी केली. त्यानुसार एकूण 412 मालमत्ता बाबतची यादीचे विवरण पत्र पोलिसांतर्फे महाराष्ट्र शासनाला सादर करण्यात आले. गृहविभागाने त्यानुसार 5 मे 2018 रोजी मालमत्ता जप्तीसंर्दभात अधिसूचना काढली. त्याअनुषंगाने विशेष जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे डीएसके आणि डीएसकेडीएल कंपनीच्या मालमत्ता जप्ती संर्दभात अर्ज करण्यात आला. त्यावर वेळोवेळी सुनावणी होऊन दीपक कुलकर्णी, हेमंती कुलकर्णी, शिरीष कुलकर्णी, तन्वी कुलकर्णी आणि डीएसकेडीएल कंपनी व इतर कंपन्यांचे नावे कोणताही बोजा नसलेल्या आणि तत्काळ विक्री योग्य अशा 143 मालमत्तांची यादी तयार करण्यात येऊन ती न्यायालयात सादर करण्यात आली आहे.

सदर मालमत्ता विक्रीमधून जमा होणारा पैसा हा न्यायालयाकडे जमा करुन त्याचे ठेवीदारांना समप्रमाणात वितरण करण्यात यावे, असे सुचविण्यात आले आहे. त्यानुसार न्यायालयाने याप्रकरणी प्रतिवादींना महाराष्ट्र ठेवीदार हितरक्षण अधिनियम 1999 चे कलम चार अन्वये नोटीस काढल्या आहेत. यापूर्वी न्यायालयाने डीएसके गुंतवणुक घोटाळ्यातील गुंतवणूकदारांना पैसे परत देण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यास पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार सदर मालमत्तांची यादी सादर करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी (दि. 28 जानेवारी) होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)