भवानीनगरातील ज्वेलर्स दुकानात जबरी दरोड्याचा प्रयत्न

भवानीनगर- येथील श्रीपाद ज्वेलर्स या सराफी दुकानावर जबरी दरोडा टाकण्याचा आठ जणांच्या टोळीचा प्रयत्न फसला. सराफी व्यावसायिक व वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या रात्री गस्तीवर असलेल्या पथकाच्या तत्परतेमुळे तिघांना जेरबंद करण्यात यश आले असून त्यांच्याकडून चोरलेली चांदीचे 7 किलो 656 मिलिग्रॅम वजनाचे दागिने (किंमत 3 लाख 46 हजार) हस्तगत केली. मात्र, 10 ते 15 तोळे सोन्याचे दागिने घेऊन पाच जण फरारी झाले, असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती अशी माहिती बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.
शौकत शेख, शमीम शेख, अजिरूज शेख (मूळ रा. झारखंड) अशी पोलिसांनी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. आज (गुरुवारी) पहाटे अडीचच्या सुमारास येथील बसस्थानकाच्या पाठीमागील श्रीपाद ज्वेलर्स हे दुकान पाठीमागून फोडण्यासाठी या सर्वांनी पाच किलोची गॅस टाकी, ऑक्‍सिजन सिलिंडरसह गॅस कटर आणला होता. नव्या कटावण्या, पक्कड अशी साधनेही सोबत आणली होती. पाठीमागच्या बाजूला अंधाराचा फायदा घेऊन रजू शेख याने गॅस कटरने भक्कम दरवाजा तोडला. त्या दरवाजातून तिघांनी आत प्रवेश करून पुन्हा आणखी एक दरवाजा गॅस कटरने तोडला. त्यानंतर आत प्रवेश करून अगोदर चांदीचे दागिने एका बॅगमध्ये भरले. त्यानंतर आतमधील तिजोरीचा खालचा भाग गॅस कटरने कापला. या दरम्यान शेजारील द्वारका डेअरीचे मालक रमेश पांढरे यांना काही तरी हालचाल सुरू असल्याचे जाणवल्याने, त्यांनी दुकानाचे मालक पंकज शहाणे यांना फोन करून कल्पना दिली. त्यांनी तातडीने दुकानापुढे येऊन पाहणी केली. तेथे काही हालचाल नव्हती, म्हणून ते पाठीमागे गेले. तर, पाठीमागील दरवाजा तुटल्याचे त्यांना दिसले. त्यांनी लगेच पोलिस चौकी गाठली. तेथे होमगार्डचा स्वयंसेवक भेटला. त्याला माहिती सांगेपर्यंत योगायोगाने गस्त घालत असलेले वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे, पोलीस नाईक भानुदास जगदाळे, चालक रुपेश नावडकर, होमगार्ड अनिल बनसोडे, विठ्ठल चव्हाण तिथे पोहोचले. त्यांना शहाणे यांनी दुकानात चोरी होत असल्याची माहिती देताच क्षणाचाही विलंब न लावता काटे यांनी पोलिस जीप थेट दुकानाच्या मागच्या बाजूस नेऊन दरवाजाला आडवी लावली. तोपर्यंत चोरट्यांनी तिजोरी फोडून आतील सोन्याचे दागिने चोरले होते. मात्र, जीपचा उजेड दिसताच सारे काम अर्धवट टाकून चोरटे पळण्यासाठी बाहेर आले. मात्र, काटे यांनी चपळाई दाखवत दोघांना तेथेच व एकाला नंतर जेरबंद केले.
या चोरीची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती नारायण शिरगावकर हे घटनास्थळी हजर झाले. दुकानातील सीसी टीव्हीचे फुटेज पाहिले असता मध्यरात्री 1 वाजता चोरट्यांनी या सोन्याच्या दुकानाचे शटर गॅस कटरने कापून दुकानात प्रवेश केला आहे. साधारण दोन तास हे चोरटे दुकानात होते. दरम्यान, या आठ चोरांपैकी तीन चोर सापडले असता त्यांनी चोरी केलेले चांदीचे दागिने हस्तगत केले मात्र, यातील पळून गेलेल्या चोराने सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.

  • पूर्वनियोजित कट
    श्रीपाद ज्वेलर्सवर दरोडा टाकाण्यासाठी आलेले हे आठ चोरांपैकी काही झारखंड मधील, तर काही बंगाल मधील आहेत. या चोरांच्या टोळीचा लीडर मगनू शेख हा बंगाल मधील आहे तर या चोरीचे नियोजन बिलू शेख याने केले असून यातील गॅस कटर चालवणारा रज्जू शेख हा आहे. व दोन दुकाना बाहेर थांबून सर्व काही बाहेरील अंदाज घेऊन चोरांना माहिती देणारे. हे सर्व चोर पिकअप गाडीतून आले होते. या आठ चोरांपैकी दोन चोर गाडीत होते. एक गाडीच्या बाहेर, चार चोर दुकानात तर एक दुकाना बाहेर असे पूर्वनियोजित कट आखण्यात आला होता. तर या चोरीत वापरण्यात आलेले गॅस कटर, कटावणी, पक्कड अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)