भवन अस्वच्छ, स्वच्छ शहर!

शहरात स्वच्छता अभियान : पालिकेला भवनाचा मात्र विसर

पुणे – महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर स्वच्छता अभियान राबवले जात आहे. पुणे महापालिकेनेही सकाळी सहा वाजल्यापासूनच शहरात स्वच्छता अभियान राबवून नागरिकांना सफाई कर्मचाऱ्यांबरोबरचा सेल्फी टाकण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. शहर स्वच्छ करण्याच्या नादात महापालिका भवन स्वच्छ करण्याचा विसर संबंधित विभागाला पडला आहे. त्यामुळे “दिव्याखाली अंधार’ अशीच परिस्थिती यातून दिसून येते.

महापालिका भवनात झिरो पेन्डन्सी करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. तसेच विविध ठिकाणी इंटिरियरची कामे केली आहेत. त्याचा राडारोडा मात्र भवनाच्या व्हरांड्यामध्येच ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये प्लायवूडपासून ते बिघडलेले प्रिन्टर, सीपीयु, कागद, फायलींचा कचऱ्याचा समावेश आहे.

महापालिका आयुक्त म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर सौरभ राव यांनी यासंदर्भात अचानक पाहणी केली होती. त्यावेळीही त्यांना हा कचरा दिसला होता. त्यांनी त्यावेळीही सूचना दिल्या होत्या. तरीही हा राडारोडा अद्याप उचलला जात नसल्याची वस्तुस्थिती याठिकाणी आहे. महापालिकेच्या विस्तारित वास्तूमध्येही हीच स्थिती आहे. याठिकाणचेही काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने येथेही बांधकामाचे साहित्य तसेच पडून असल्याचे दिसून येते.

याबाबत महापालिका भवनातील कचरा लवकरात लवकर काढून टाकण्यात येईल, अशी प्रतिक्रिया घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली आहे.

क्षेत्रीय कार्यालयांमधील स्थिती गंभीर
महापालिका भवनाला अनेक गेट आहेत. त्यातील काही गेट सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवले आहेत. त्या गेटमध्येही कचरा टाकण्यात आला असून, तेथील स्वच्छताही गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात आली नाही. ही महापालिका भवनातील स्थिती आहे; तर क्षेत्रीय कार्यालयांमधील स्थिती यापेक्षा अधिक गंभीर आहे. त्यामुळे तेथील स्वच्छतेचे काय हा प्रश्‍न देखील या निमित्ताने निर्माण झाला आहे. शहर स्वच्छ करायला निघालेल्या महापालिकेला भवनातील कचरा दूर करता येत नसल्याचेच यातून स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)