भर पावसातही देखावे पहाण्याचा उत्साह कायम

पुणे – हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात सर्वत्र पाऊसाची संततधार सुरु आहे, मात्र तरीही गणपती मंडळांचे देखावे पहायला जाण्याची परंपरा, उत्साह या भर पावसातही मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. मध्यवर्ती शहरात लोक छत्र्या घेऊन तसेच रेनकोट घालून टू व्हिलरवरच गणपती पहाण्याचा आनंद घेताना दिसत आहे.

गणपती बसून सध्या दोनच दिवस झाले असले तरीही नंतरची वाढती गर्दी पहाता अनेक नागरिकांनी आतापासूनच गणपती पहायला जाण्यास गर्दी केली आहे. मुख्य म्हणजे यामध्ये लहानग्यांबरोबरच वृध्दांचे प्रमाणही अधिक पहायला मिळत आहे. संध्याकाळच्या वेळी शहरातील अनेक भागात मोठ्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे. मात्र टू व्हिलरला जाण्यास परवानगी दिली जात असल्याने अनेक नागरिक टू व्हिलरवर जात जातच गणपती पहाणे पसंत करत आहे. मध्यवती शहरात लहान मुलांसाठी आकर्षक वाटणारे अनेक देखावे करण्यात आल्याने ते पहाण्यासाठी मोठी गर्दी केली जात आहे.

सध्या दिवसभर पावसाच्या सरी सुरु असल्या तरीही पाऊस आला की बाजूला उभे रहाणे व गेला की पुन्हा देखावे पहाण्यास सुरुवात करणे असा प्रकार सुरु आहे. मुख्य म्हणजे वाहतूक पोलिसही नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करताना दिसत आहे.

प्रसंग एक
शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग वाड्याजवळ एक अत्यंत वृध्द आजी भाड्याची रिक्षा शोधत होत्या. मात्र त्यांना ती मिळत नव्हती. त्यांनी मला रिक्षा हवी आहे असे तेथील वाहतूक पोलिसांना सांगताच तेथील वाहतूक पोलिसांनी लगेचच एका रिक्षाचालकाला थांबवत आजींना हवे तेथे सोडण्यास सांगितले. रिक्षावालेही लगेचच तयार झाले. त्या रिक्षात बसल्यावर आजींनी वाहतूक पोलिसांना हात जोडून धन्यवाद केलेला तो प्रसंग अनेकांनी पाहिल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि एकीची भावना दिसत होती.

प्रसंग दोन
रविवारी शहरात संध्याकाळच्या वेळेला फार पाऊस पडत होता. अनेक जण आडोश्‍याला आसरा घेऊन थांबले होते. शहरातील मध्यवर्ती भागात एका मंडळाने गाण्यांच्या चालीवर चालणारी विद्युत रोषणाई केली होती. तेव्हा सैराट मधील झिंगाट गाणं लागल्यानंतर येणारे जाणारे टू व्हिलर चालक यांच्यासहित आडोश्‍याला उभे असणारे नागरिकही आहे त्या जागेवर थिरकू लागले. लहान मुलांचा उत्साहही वाढला. त्यामुळे एका क्षणात त्यावेळी वातावरण निर्मिती झाल्याचे पहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)