नांदुर- वाढत्या उन्हामुळे दौंडकर त्रासले आहेत. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून मे महिना सुरू झाल्यापासून तर ती तीवत्रा अधिकच जाणवत आहे. सध्या सकाळी 11 ते सायंकाळी पाच दरम्यान घराबाहेर पडू नये, अशी अवस्था आहे. अशा स्थितीत नेते मंडळींना मात्र वातानुकूलित वाहनातून बाहेर येऊन 41 अंशाच्या तापमानात कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर लग्नसमारंभांना हजेरी लावावी लागत आहे.
चालु वर्षात बाराही महीने विवाहाचे असले, तरी 42 मुहूर्त मार्च, एप्रिल, मे आणि जून या चार महिन्यांतील आहेत. भर उन्हात दुपारी विवाह सोहळेही मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यामुळे कडक उन्हातही रेल्वे स्थानके आणि बसस्थानके गजबजलेली आहेत, तर दुसरीकडे भर उन्हातही जास्तीत जास्त लग्नांना हजर राहण्यासाठी पुढारी मंडळींनी ओढाताण करावी लागत आहे. नेत्यांनी सोहळ्यांना हजर राहावे, असा कार्यकर्त्यांचा देखील आग्रह असतो, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर, त्यांना नाराज न करता या सोहळ्यांना हजर राहणे नेत्यांसाठी महत्त्वाचे ठरते आहेण
लोकसभा, विधानसभेपासून अगदी जिल्हा परिषद, पंचायम समिती, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, जिल्हा सहकारी बॅंक, ग्रामपंचात आदी निवडणुका टप्प्या टप्प्याने सुरीच असतात. अशा वेळी कार्यकर्त्यांची खऱ्या अर्थाने नेत्यांना गरज असते. आपला कार्यकर्ता टिकला पाहिजे, या एकमेव उद्देशाने नेतेमंडळी लग्नकार्यांना हजेरी लावत आहेत. कार्यकर्त्यांबरोबर नेते मंडळींना मतदारांनाही चुचकारायचे आहे. त्यामुळे भलीमोठे यादी सोबत घेऊन नेतेमंडळी गावोगावी फिरताना दिसत आहेत. ही नेते मंडळी अशा सोहळ्यांना जातात त्यावेळी कुठे नवरदेवाचे वऱ्हाड आलेले नसते, तर कुठे लग्न लागून गेलेले असते; पण नेत्यांची हजेरी महत्त्वाची असल्याने त्या सोहळ्यात जाऊन मानाचे फेटे आणि हार-तुरे स्वीकारत हे पुढारी पुढे सरकताना दिसत आहेत. त्यामुळे उन्हाळा कडक असला तरी नेते मंडळीची उन्हाबरोबरच या लग्न सोहळ्यांना जाताना दमछाक होते आहे, हे मात्र नक्की!
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा