भरे गावात सात-बाराचे चावडी वाचन

हिंजवडी, (वार्ताहर) – 1 ऑगस्टपासून संपूर्ण संगणकीकृत सात-बारा उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी भरे (ता. मुळशी) सांगितले. डिजिटल इंडिया राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत मुळशी तहसील तर्फे सात-बाराचे चावडीत वाचनाचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला होता.

या वेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी सौरभ राव, मुळशी-मावळचे प्रांत अधिकारी सुभाष भागडे, मुळशी तहसीलदार सचिन डोंगरे, सभापती कोमल वाशिवले, गट विकास अधिकारी स्मीता पाटील, भरे सरपंच संगीता खरात आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, गावचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, म्हणूनच सात-बाराच्या नोंदी योग्य असतील, तर विकास करणे सोयीस्कर होईल. त्यामुळे संगणकीकृत सात-बारा उपलब्ध करून देताना शासकीय अधिकाऱ्यानी नोंदी बरोबर झाल्या आहेत, असे म्हणणे हे शासनाला मान्य नव्हते. जमिनीच्या मालकांनी त्या बरोबर आहेत, असे म्हणणे आवश्‍यक असल्याने सात-बाराचे चावडी वाचन उपक्रम राबवला. मुळशी तालुक्‍यातील सात-बाराचे 95 टक्‍के संगणकीकरण झाले असून येत्या 8 दिवसांत उर्वरित काम पूर्ण होईल. तसेच जिल्ह्यातही 80 टक्‍के काम झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

चावडी वाचन चालू असताना शेतकरी, जमीन मालकांनी उपस्थित केलेल्या शंका दूर करून उपस्थितांकडून आलेल्या सूचनाचा स्वीकार करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तयारी दर्शवली. जमिनीच्या सात-बारावर इकरार नोंदी कायम राहतात, त्या वेळीच कमी न केल्याने तलाठी तसेच जमीन मालकांनाही त्रास होतो. त्या संबंधीत बॅंका, संस्थांकडून ना-हरकत पत्र घेवून इकरार नोंदी रद्द केल्या जातील, असे आश्‍वासनही जिल्हाधिकारी राव यांनी दिले.

तसेच भरे ग्रामस्थ पुराच्या नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित राहण्यासाठी गायरानात वसाहत केली आहे. त्या गावठाण विस्तारास मंजुरी द्यावी, अशी विनंती भरे गावचे माजी सरपंच यांनी केली व त्यास जिल्हाधिकारी राव यांनी मंजुरी दिली आहे.

या वेळी उपस्थितांमध्ये तलाठी हनुमंत चांदेकर, ग्रामस्थ आबासाहेब शेळके, शंकर ववले, सतीश ववले, दिलीप ववले, नारायण ववले, आत्माराम ववले आणि मान्यवर उपस्थित होते. प्रांत अधिकारी सुभाष भागडे यांनी प्रास्ताविक केले. तहसीलदार सचिन डोंगरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)