भरदिवसा सदनिका फोडून भामट्यांचा दागिन्यांवर डल्ला

महाळुंगे इंगळे-सदनिका मालक सदनिकेचा दरवाजा बंद करून काही कामानिमित्त बाहेर गेला असता घरात कोणी नसल्याची संधी साधून मेदनकरवाडी (ता. खेड) येथे सोमवारी (दि. 17) सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान अज्ञात भामट्यांनी बनावट चावीचा वापर करून बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटातील सोन्याच्या चैनीसह गळ्यातील मणी मंगळसूत्र, कानातील झुबे, नेकलेस अशा एकूण 90 हजार रुपये किमतीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. या घटनेनंतर फरारी झालेल्या अज्ञात भामट्यांवर येथील पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
विलास भिकाजी काळे (वय 42, रा. तूलीब होम्स, बिल्डिंग डी विंग, फ्लॅट नं. 603, मेदनकरवाडी, ता. खेड; मूळ रा. खडकी, ता. दौंड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. काळे हे सोमवारी सकाळी काही कामानिमित्त घराचा दरवाजा बंद करून बाहेर गेले होते. त्यानंतर घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात भामट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप बनावट चावीचा वापर करून उघडले. घरात दबक्‍या पावलाने प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी कपाट उचकटून कपाटातील एक तोळे वजनाची सोन्याची चैन, मणी मंगळसूत्र, सोन्याची अंगठी, नेकलेस असा एकूण 90 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काळे हे घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात गेल्यानंतर त्यांना वरील प्रकार झाल्याचे निदर्शनास आले. काळे यांनी येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चाकण पोलिसांनी अज्ञात भामट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पवार, पोलीस हवालदार दत्तात्रय जाधव, नामदेव जाधव व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)