भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना शिस्तीचा दंडुका

‘रेस कोर्स परिसरात लष्करी जवानाने तरुणांना दाखविला खाक्या’

पुणे – लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे मराठा लाइफ इंफ्रन्ट्री प्रादेशिक सेनेत भरतीची प्रक्रिया सुरू आहे. रेसकोर्स येथील जनरल परेड ग्राऊंड येथे सुरू असलेल्या या भरतीसाठी पहिल्या दिवशी आलेल्या सुमारे 7 हजार तरुणांना सुविधांअभावी या तरुणांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सोमवारी दिसले. दरम्यान, रेसकोर्स येथे तरुणांना पिटाळून लावण्यासाठी एका जवानाने थेट दंडुक्‍याचा आधार घेतल्याचे दिसून आले.

लष्करातर्फे 7 ते 9 जानेवारीपर्यंत ही भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये जवान, क्‍लार्क, स्टाफ ड्युटी, जवान हेअर ड्रेसर्सची, वॉशरमॅन अशा विविध पदांसाठी सुमारे 250 तरुणांची निवड केली जाणार आहे. या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र, गुजरात, दादर आणि नगर हवेली, दीव-दमण आणि लक्षद्वीप येथील तरुण सहभागी झाले होते. तर, मंगळवारी तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, आंध्र प्रदेश, गोवा आणि पॉंडेचेरी या राज्यातील तरूणांची भरती होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यासाठी पहिल्या दिवशी तब्बल 7 हजार तरुणांनी उपस्थिती लावली. पहाटेपासूनच ही भरती होणार असल्याने रविवारी रात्रीपासूनच कॅम्प परिसर आणि रेस कोर्स परिसरात तरुणांचे जत्थे दिसून आले. या तरुणांसाठी कोणतीही सोय सैन्य दलाने केलेली नव्हती. त्यामुळे रात्रीच्या सुमारास या उमेदवारांचे हाल झाले. अनेक ठिकाणी शेकोटी करून तरूण रात्रभर जागेच होते. तसेच सकाळीदेखील अनेक जण काहीच न खाता भरतीमध्ये सहभागी झाले होते. इतकेच नव्हे तर भरतीसाठी अलेल्या तरूणांना सैन्याच्या जवानांकडून काठीने मारहाण करण्यात येत असल्याचेही यावेळी पाहायला मिळाले.

दरम्यान, “लष्करातर्फे भरती प्रक्रियेत उमेदवारांसाठी नाश्‍ता-पाणी आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, उमेदवारांचे प्रमाण जास्त असल्याने सर्वांनाच तो उपलब्ध झाला नसल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तसेच, ही प्रक्रिया पोलिसांच्या देखरेखीत होत असल्याने याठिकाणी कोणतेही गैरप्रकार घडणे शक्‍य नाही. तरुणांच्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी जवान काम करत होते. मात्र, यावेळी मारहाणीचा कोणताही प्रकार घडला नाही,’ असा दावा मुख्यालयाने केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)